नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील १९ ज्यातील ४८ नद्या व समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कृष्णा, मुळा-मुठा नद्या आणि मिऱ्या व गणपतीपुळे समुद्र किनारे यांचा या मोहिमेत समावेश आहे. या स्वच्छता मोहिमेसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने १९ बनवल्या आहेत.यामध्ये केंद्रीय पर्यावरण, वने, हवामान बदल विभागाचे वरीष्ठ अधिकारी, राज्यातील नोडल एजन्सी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे, जिल्हा प्रशासन, समुद्र किनारी असणारे मत्स्य महाविद्यालय तसेच अन्य शैक्षणिक, संशोधन संस्थांचाही यात समावेश आहे. या टीम स्थानिक शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, स्थानिक समूहांना सोबत घेऊन स्वच्छता मोहिम राबविणार आहेत. या मोहिमेसाठी पर्यावरण विभागाने इको क्लब शाळेचा सहभाग घेतला आहे. विभागाच्या वतीने राष्ट्रीय हरीत कॉर्प्स कार्यक्रमांतर्गत या मोहिमेसाठी आर्थिक मदत पुरविली जाणार आहे.स्वच्छता मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या नद्या, समुद्र किनारे, तलावांना स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकी 10 लाख रूपये खर्च करण्यात येईल. निवडण्यात आलेल्या स्थळांच्या आसपासच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूही स्वच्छ करण्यात येतील. ही मोहिम १५ मे पासून सुरू करण्यात आली असून ती ५ जूनपर्यंत राबविली जाणार आहे. या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा, जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन असणार आहे, अशी माहिती पत्र सूचना कार्यालयाने काढलेल्या वृत्तात दिली आहे.