रत्नागिरी : आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे असून दर दिवशी नवीन नवीन शोध जागतिक पातळीवर होत आहेत. या तंत्रज्ञानांची माहिती करुन घेऊन येत्या काळातील नवीन आव्हानांना महिलांनी सामोरे जावे, असे आवाहन महिला चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या सुमती जांभेकर यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम झाला.
आजच्या महिलांकडे पुरुषांच्या मानाने अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यामध्ये घर, मुले व कार्यालय अशा तीन महत्वाच्या जबाबदाऱ्या त्या पार पाडत आहेत. या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी नवनवीन ध्येय आखण्याचा प्रयत्न करावा अशी आशाही त्यांनी जांभेकर यांनी व्यक्त केली.
कोकण विभागातील महिला या अत्यंत कर्तव्यदक्ष आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात चुका होण्याचे प्रमाण फार कमी आहे. स्त्री ही विश्वाची जननी असल्याने हे महत्व त्यांना निसर्गाने दिलेले वरदानच आहे असे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी सांगितले. आजच्या काळात चुल आणि मुल ही संकल्पना कालबाह्य झाली आहे. आता महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. येत्या काळात सर्व अतिमहत्वाच्या पदावर महिला विराजमान होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर, तहसिलदार प्रियांका आयरे, अपर जिल्हाधिकारी यांच्या पत्नी नयना बेलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी महिला व कर्मचारी महिला उपस्थित होत्या.