रत्नागिरी, (आरकेजी) : नाणार येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचं स्वागत करणारा फलक प्रकल्पग्रस्त महिलांनी फाडून टाकला. राजापूर रेल्वे स्टेशन परिसरात भाजकडून हा फ़लक लावण्यात आले होते. या फलकावर भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने आणि राजश्री (उल्का) विश्वासराव यांची छायाचित्रे होती. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्त महिलांनी नागपूरमधील आंदोलनावरून परतल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी हे बनर्स फाडले.
राजापूर तालुक्यातील नाणार प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापलं आहे. नागपुरातील पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजत आहे. कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेनं नागपूरमध्ये आंदोलनही केलं. राजापूरमधील शेकडो महिला या आंदोलनाला गेल्या होत्या. तीव्र असतानाही काही उत्साही कार्यकर्त्यांनी फलक लावला. या प्रकल्पामध्ये किती कोटींची गुंतवणूक असणार आहे, किती रोजगारनिर्मिती होणार आहे, असा मजकूर या फलकावर आहे. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, तसेच समर्थ वुमन्स वेलफेअर्स असोसिएशनच्या राजश्री (उल्का) विश्वासराव यांची छायाचित्रे आहेत. एकीकडे तीव्र विरोध असतानाही अशा प्रकारचा फलक लावण्यात आल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष आहे. शुक्रवारी संध्याकाळी या असंतोषाचा भडका उडाला आणि संतप्त झालेल्या महिलांनी राजापूर रेल्वे स्टेशन परिसरात लावलेला फलक फाडून टाकला. उंचावर लावलेले हे बॅनर्स महिलांनी फाडून टाकत आपला रोष व्यक्त केला.