सिंधुदुर्ग : कोकणाताली महिलांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे पुढचे पाऊल आज टाकल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. लुपिन फौंडेशनच्या महिला सक्षमीकरण उपजीविका उपक्रमांतर्गत आज सावंतवाडी येथील श्रीराम वाचनालय येथे आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, अतुल काळसेकर, लुपिन फौंडेशनचे योगेश प्रभू, सिताराम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.लुपिन फौंडेशनच्या माध्यमातून कोकणातील महिलांच्या जीवनामध्ये समृद्धी आणण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगून श्री.प्रभू पुढे म्हणाले की, यामध्ये अनेक बचतगट जोडले गेले आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे. महिलांचा विकास झाला तरच समाजाचा विकास होऊ शकतो. त्यामुळे महिलांचा विकास महत्वाचा आहे. महिलांच्या विकासासाठी आमची बांधिलकी आहे. या उपक्रमामध्ये महिलांनी सहभागी व्हावे, त्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभे होता येईल. विकासाच्या प्रक्रियेमध्ये कोणामध्ये भेद करण्याचे कारण नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.महिला बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे असे सांगून पालकमंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले की, महिलांनी सक्षम होण्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. ग्रामीण भागा प्रमाणेच शहरी भागातील महिलांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करण्यात येत आहेत. बांबूपासून फर्निचर निर्मितीसारख्या योजना आहेत. तसेच चांदा ते बांदा या योजनेतून महिलांसाठी अनेक प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरणचाही समावेश आहे. भविष्यात महिलांनी कृषियंत्र चालवणताना दिसावे अशी अपेक्षा आहे. या योजनांसाठी जास्तीत जास्त महिलांनी तसेच सिंधुदुर्गातील लोकांनी अर्ज कारावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.या कार्यक्रमामध्ये सावंतवाडी येथील माहेर लोक संचालीत साधन केंद्र, मालवण येथील सिंधुकन्या, कणकवली येथील हिरकणी, देवगड येथील अन्नपूर्णा या लोक संचलीत साधन केंद्रांना 5 लाखांचे कर्ज मंजुरीचे धनादेश प्रदान करण्यात आले. तसेच 24 शाळांना पुस्तक पेढीचे वाटपकरण्यात आले. दोन लोक संचालीत साधन केंद्रांना आरोग्य तपासणी कीटचे वाटपही यावेळी करण्यात आले. यामध्ये 18 प्रकराच्या तपासण्या करता येणार आहेत.