रत्नागिरी, (आरकेजी) : खेड तालुक्यातील सुकीवली येथील अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी खेडमध्ये आज महिलांच्या वतीने विराट मुक मोर्चा काढण्यात आला. या विराट मूक मोर्चाला हजारोच्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते. तसेच आमदार भास्कर जाधव , नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांसह व्यापारी, उद्योजक सहभागी झाले होते.
सुकीवली येथील नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करून निर्घृण खून करणाऱ्या तिच्याच नात्यातील सूर्यकांत नवनाथ चव्हाण याला फाशीचीच शिक्षा होण्यासाठी तसेच या तरुणीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आज खेड तालुक्यातील महिलांच्या वतीने विराट मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील महिला दक्षता समितीच्या सदस्य नंदिनी खांबे आणि संजना कुडाळकर , दीप्ती सावंत , सुप्रिया पवार यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये खेड तालुक्यातील महिला व पुरुष तसेच महाविद्यालयीन तरुण तरुणी सहभागी झाले होते. खेड शहरातील छत्रपती शिवाजी चौकातून सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. तालुक्यातील अनेक महिला संघटना तसेच सामाजिक संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला होता. हा मूक मोर्चा छत्रपती शिवाजी चौकातून बस स्थानक , वाणी पेठ , बाजारपेठ, निवाचा तळ , गांधी चौक, तीनबत्ती नाका, हुतात्मा अनंत कान्हेरे चौक , ते कॅफे कॉर्नर मार्गे पोलीस स्टेशनपर्यंत आला. त्यानंतर पोलिसांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी तसेच पुन्हा असा प्रकार घडू नये या साठी पोलिसांनी खबरदारी घ्यावी . खेड पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी असे प्रकार घडू नयेत या साठी पोलीसमित्र म्हणून महिला, महाविद्यालयातील विद्यार्थिनींची निवड करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.