मुंबई, विशेष प्रतिनिधी : विविध उद्योगांमधील व्यावसायिक दिग्गजांच्या वाढत्या युतीसह, महिंद्रा समूहानेदेखील ‘स्टेकहोल्डर कॅपिटलिझम मेट्रिक्स’ची अंमलबजावणी करण्यासाठीची आपली कटिबद्धता आज जाहीर केली. पर्यावरणीय, सामाजिक व प्रशासकीय (ईएसजी) परिमाणे आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) व या फोरमची इंटरनॅशनल बिझनेस कौन्सिल (आयबीसी) यांनी जाहीर केलेल्या प्रकटीकरणाचा हा एक संच आहे. सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन एंटरप्राइझ मूल्य निर्मितीचे मापन त्यातून करण्यात येते.
या कटिबद्धतेविषयी, महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, “लोकांचा व पृथ्वीतलाचा विचार न करणाऱ्या व्यवसायांच्या तुलनेत, काही विशिष्ट उद्देशाने चालणारे व्यवसाय अधिक बळकट असू शकतात. गुंतवणुकदारांनाही हे माहीत असते. ‘ईएसजी मेट्रिक्स’च्या व्यापक विकासाद्वारे रिपोर्टिंगचे प्रमाणिकरण करण्याच्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या प्रयत्नांचे आम्ही समर्थन करतो. हे प्रयत्न म्हणजे शाश्वत जगाकडे जाण्यासाठीचे एक पुढचे पाऊल आहे, असा आमचा विश्वास आहे.” विद्यमान ऐच्छिक मानकांद्वारे तयार केलेल्या ‘स्टेकहोल्डर कॅपिटलिझम मेट्रिक्स’मध्ये, लोक, पृथ्वीतल, समृद्धी व कारभाराची तत्वे यांच्यावर आधारीत 21 सार्वत्रिक, तुलनात्मक प्रकटीकरणांचा मुख्य संच समाविष्ट आहे. व्यवसाय, समाज व पृथ्वीतलासाठी ही कारभाराची तत्वे अतिशय महत्त्वाची मानली जातात. शाश्वत बाबतीतील प्रगती प्रमाणित करण्याची कंपन्यांची व गुंतवणुकदारांची क्षमता या प्रकटीकरणांतून बळकट होते. त्याद्वारे निर्णय घेण्यामध्ये सुधारणा होते आणि कंपन्या निर्माण करीत असलेल्या सामायिक व शाश्वत मूल्यांच्या संदर्भात पारदर्शकता व जबाबदारी यांच्यात वाढ होते. महिंद्रा, डाऊ, युनिलिव्हर, नेस्ले व सोनी यांच्यासह उद्योग क्षेत्रातील दिग्गज व त्यांच्या कंपन्या, पुढील मुद्द्यांबाबत कटिबद्ध आहेत.
गुंतवणूकदार आणि इतर भागधारकांना देण्यात येणाऱ्या माहितीमध्ये (उदा. वार्षिक अहवाल, शाश्वततेचे अहवाल, प्रॉक्सी स्टेटमेन्ट्स किंवा इतर साहित्य) प्रमुख मेट्रिक्स प्रतिबिंबित करणे; आपल्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या ‘मेट्रिक्स’चा अहवाल देणे किंवा भिन्न दृष्टीकोन अधिक योग्य का आहे, याबद्दल थोडक्यात समजावून सांगणे. या कामास सार्वजनिकरित्या पाठिंबा देणे आणि आपल्या व्यावसायिक भागीदारांना तसे करण्यास प्रोत्साहित करणे. सामान्य ‘ईएसजी मेट्रिक्स’वरील बिगर-आर्थिक अहवालासाठी जागतिक स्तरावर स्वीकारल्या गेलेल्या सोल्युशनच्या प्रगतीस पाठिंबा देण्याकरीता विद्यमान ईएसजी मानके, चौकटी आणि तत्त्वांच्या पुढील अभिसरणांना प्रोत्साहन देणे. ही कटिबद्धता व्यक्त करताना, व्यवसायिक दिग्गज हे सूचित करीत आहेत, की ईएसजी घटक सर्व व्यवसायांच्या यशासाठी आणि दीर्घकालीन व्यवहार्यतेसाठी वाढत्या प्रमाणात महत्त्वाचे आहेत. यावरून आपली मुख्य रणनीती, कामकाज आणि कॉर्पोरेट प्रकटीकरणांमध्ये शाश्वतता आणण्याचा अग्रगण्य जागतिक कंपन्यांचा हेतू स्पष्ट दिसून येतो. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष क्लाउस श्वॅब म्हणाले, “स्टेकहोल्डर कॅपिटलिझम (भागधारकांची भांडवलशाही) आता खरोखर मुख्य प्रवाहात आली आहे. कंपन्यांनी केवळ आपल्या आर्थिक बाबीच नव्हे, तर ईएसजी परिणामदेखील जाहीर केल्याने, जागतिक अर्थव्यवस्थेसाठी प्रगती, लोक व पृथ्वीतल यांच्यासाठी काम करणारी महत्त्वाची प्रक्रिया सुरू झाली आहे.” सीडीपी, क्लायमेट डिसक्लोझर स्टँडर्ड्ज बोर्ड (सीडीएसबी), ग्लोबल रिपोर्टिंग इनिशिएटिव्ह (जीआरआय), इंटरनॅशनल इंटिग्रेटेड रिपोर्टिंग कौन्सिल (आयआयआरसी) आणि सस्टॅनिबिलिटी अकाउंटिंग स्टँडर्ड्स बोर्ड (एसएएसबी) या विद्यमान मानकांशी संबंधित असलेल्या परिमाणांमध्ये, प्रशासकीय संस्थेची गुणवत्ता, भागीदारांची व्यस्तता, नैतिक वर्तन आणि जोखीम व संधींची निरीक्षणे या संकल्पनांचा समावेश होतो. या मेट्रिक्स व प्रकटीकरणांचा अवलंब करुन, त्यांचा अहवाल देऊन, उद्योग क्षेत्र विद्यमान मानकांमध्ये मोठे सहकार्य व संरेखन वाढवू शकेल आणि शाश्वत कामगिरीबद्दलच्या रिपोर्टिंगसाठी जागतिक स्तरावर स्वीकारलेल्या सामान्य मानकांच्या संचाच्या विकासास प्रगती करण्यास प्रोत्साहित करू शकेल. महिंद्रा समूहातर्फे गेल्या बारा वर्षांपासून ‘ग्लोबल रिपोर्टिंग इनिशिएटिव्ह’ (जीआरआय) फ्रेमवर्कवर आधारित शाश्वततेचा अहवाल नियमितपणे प्रकाशित करण्यात येत आहे. जागतिक स्तरावर या अहवालांना ‘गोल्ड स्टॅंडर्ड’ असे मानले जाते. महिंद्रा अँड महिंद्रा गेल्या तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय <आयआर> फ्रेमवर्कवर एकात्मिक अहवाल प्रकाशित करीत आहे. या अहवालांना जागतिक स्तरावर अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत.