विक्रम फडणीस यांनी एक यशस्वी फॅशन डिझायनर ते यशस्वी दिग्दर्शक अशी नवीन ओळख निर्माण केली आहे. ‘हृदयांतर’ चित्रपटानंतर विक्रम फडणीस सगळ्यांना ‘स्माईल प्लीज’ म्हणताना दिसत आहे. नक्की काय आहे ‘स्माईल प्लीज’? सांगत आहे खुद्द विक्रम फडणीस.
…आणि दिग्दर्शक झालो
माझे आई-वडील डॉक्टर आहेत. त्यामुळे साहजिकच मी सुद्धा डॉक्टरच होईन, असेच सगळ्यांना वाटत होते. मात्र मला काहीतरी वेगळेच करायचे होते. सायन्स शाखेत प्रवेश तर घेतला आणि नंतर कॉमर्स मधून पदवी घेतली. मग मी फॅशनच्या जगात पाऊल ठेवले. फॅशनसाठी आवश्यक कोणतीही पदवी किंवा प्रशिक्षण नसताना निव्वळ आवड आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. घरच्यांनी अगदी विरोध नाही केला मात्र त्यांना मनापासून वाटत नव्हते मी फॅशन क्षेत्रात काम करावे. जसजसे या क्षेत्रात यश मिळत गेले तसतसा त्यांचा विरोध मावळला. चित्रपटसृष्टीत काम करत असतानाच दिग्दर्शकाची खुर्चीही मला खुणावू लागली होती. डोक्यात ‘हृदयांतर’ची पटकथा हळूहळू आकार घेत होती. खरं सांगायचे तर मला ‘हृदयांतर’ हा सिनेमा हिंदी मध्ये बनवायचा होता परंतु काही अडचणींमुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे हा सिनेमा मी मराठी मध्ये बनवायचे ठरवले आणि दिग्दर्शक झालो.
‘स्माईल प्लीज’ आईसाठी
‘स्माईल प्लीज’ हा सिनेमा मी माझ्या आईला समर्पित केला आहे. तिच्या आयुष्यातील काही घटनांवर आधारित हा सिनेमा आहे, परंतु हा तिचा चरित्रपट नाही हे अधोरेखित केले पाहिजे. माझी आई काही महिन्यांपूर्वीच हे जग सोडून गेली. तिच्या अगदी जवळची कथा असल्यामुळे तिने हा सिनेमा पाहावा अशी माझी खूप इच्छा होती परंतु काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आता हा माझा पूर्ण झाला आहे. माझी आई जिथे आहे तिथून ती माझे काम पाहात असेलच. आपल्या आजूबाजूला अनेक चांगल्या वाईट घटना घडत असतात. त्यातूनच आमच्यासारख्या लोकांना चित्रपटाची कथा सुचते. हा चित्रपटही मला असाच सुचला. मग त्याच्यावर मी आणि इरावती कर्णिक यांनी काम केले, आणि आज हा सिनेमा तुमच्यासमोर आहे.
मुक्ताला पर्याय नव्हताच ; इतर कलाकारांची निवड योग्य
माझा पहिला सिनेमा ‘हृदयांतर’चे फोटोशूट चालू असताना मी, मुक्ता आणि माझी क्रिएटिव्ह हेड चर्चा करत होतो, तेव्हाच मी मुक्ताला विचारले की, माझ्या डोक्यात एक पटकथा आहे आणि मला वाटते की तू एकदा ती वाचवी. तिने सुद्धा त्वरित होकार दिला. मुळात मुक्ताचे काम मला वैयक्तिकरित्या खूप आवडते. मुक्ता अतिशय सर्जनशील अभिनेत्री आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही. दिग्दर्शकाला तिच्याकडून काय अपेक्षित आहे ते तिला माहित असते. त्यामुळेच तिला खूप काही समजावून सांगायची गरज नसते. ‘हृदयांतर’ मध्ये काम केल्यामुळे आमच्यात एक कम्फर्ट झोन तयार झाला आहे. तिच्या अभिनयाचा मी फॅन आहे. त्यामुळे मुक्ताच ‘नंदिनीला’ न्याय देईल असे वाटले.
ललितचा मी ‘तुझं तू माझं मी’ हा चित्रपट पहिला आणि मी त्याच्या अभिनयाच्या प्रेमातच पडलो. तेव्हाच मी त्याला म्हटले होते, की तुझ्यासोबत भविष्यात नक्कीच काम करेन. तेव्हा ललितने माझे बोलणे फारसे मनावर घेतले नाही. पण मी जेव्हा त्याला या भूमिकेसाठी संपर्क केला तेव्हा त्याला विश्वास बसला. प्रसाद सोबत मी काम केले नव्हते पण त्याच्या कामाबद्दल मला शाश्वती होती.
‘स्माईल प्लीज’ म्हणजे संघर्ष
‘स्माईल प्लीज’ म्हटले की आपल्यासमोर कोणीतरी कॅमेरा समोर धरला आहे असे वाटते. फोटो काढण्यापुरता आपण खूप सहजपणे हा शब्द उच्चरतो. पण, हा शब्द नुसता फोटो काढण्यापुरता मर्यादित नसून त्यापलीकडे सुद्धा ‘स्माईल प्लीज’ चा व्यापक अर्थ आहे. प्रत्येक व्यक्ती तिच्या आयुष्यात जगण्यासाठी संघर्ष करते. मग तो मानसिक, शारीरिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारचा असू शकतो. अशा व्यक्तीला आपण फक्त ‘स्माईल प्लीज’ म्हटले तरी त्याचे अर्धे दुःख कमी होते.
कामाच्या बाबतीत काटेकोर
खूप लोक म्हणतात, की मी कामाच्या बाबतीत अतिशय कडक आहे. मात्र हे अर्धसत्य आहे. कारण मला कामाच्या वेळेत काम आणि मजामस्ती करायच्या वेळेत मजामस्ती करायला आवडते. कामाच्या बाबतीत काटेकोर राहावेच लागते कारण तसे केले नाही तर ठरलेल्या वेळेत काम पूर्ण होणारच नाही. वेळ वाया घालवायला मला अजिबात आवडत नाही. माझ्या काटेकोरपणामुळेच तर ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट फक्त २८ दिवसांत चित्रित झाला.