मुंबई, 11 July : धारावीकरांच्या संयमाची, कोरोनामुक्तीच्या लढ्याची जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दखल घेतली आहे अशा शब्दात शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कोरोनाविरुध्दच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून धारावीची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना त्या बोलत होत्या. प्रा. गायकवाड म्हणाल्या, साडेतीन महिने माझ्या सोबत दिवसरात्र काम करणारे ,रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी तयार केलेल्या ॲम्बुलन्सचे खाजगी वाहन चालक, स्थानिक डॉक्टर असोसिएशन यांनी माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तपासणीस सहकार्य केले. भारतीय जैन संघटनेने मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन व डिजिटल एक्स रे मशीन उपलब्ध करुन दिली .
सर्व डॉक्टर, भारतीय जैन संघटना, सर्व कार्यकर्ते, स्वयंसेवक व सर्व धारावीकरांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले व सहकार्यासाठी आभार मानले आहेत.
आपण सर्वांनी संयमाने व धैर्याने याचा सामना केला . अनेक अडचणींचा सामना करत असतानाही आपलं मनोधैर्य खचू दिले नाही.त्यामध्ये सर्व प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले, असा आवर्जून उल्लेख प्रा. गायकवाड यांनी केला आहे.