रत्नागिरी, (आरकेजी) : व्हॉटसअॅप हे केवळ टाईमपासचे साधन आहे, असे म्हणणार्यांना आता वेगळ्या दृष्टीकोनातून नव्या पिढिच्या या अॅपकडे पाहावे लागणार आहे. रत्नागिरीतील एका ग्रुपवर शेतकरी कुटुंबातील अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या वैष्णवी आलीम या चिमुकलीच्या हृद्य शस्त्रक्रियेसाठी मदत हवी, असा संदेश आला आणि अवघ्या काही तासातच व्हॉटसअॅपच्या एका आवाहनावर एक लाख रुपये जमा झाले आणि माणुसकीचे एक अनोखे दर्शन घडले.
या मदतीचा उपयोग वैष्णवीच्या शस्त्रक्रियेसाठी होणार आहे. रत्नागिरीकरांनी दाखविलेल्या या सामाजिक बांधीलकीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
चार वर्षांची वैष्णवी रत्नागिरी तालुक्यातील करबुडे या गावात राहते. तिच्या हॄदयाला चार छिद्र आहेत. तिच्यावरील उपचारासाठी शेतकरी असणाऱ्या वैष्णवीच्या वडिलांची साठवलेली सर्व पुंजी खर्च झाली. आणखी साडेचार लाख शस्त्रक्रियेसाठी आवश्यक होते. मात्र है पैसे जमवायचे कसे? याचा मोठा प्रश्न तिच्या वडिलांसमोर होता. मदतीसाठी वणवण फिरत असताना रत्नागिरीतील हेमतं वणजू यांच्याशी ओळख झाली. त्यांनी सर्व परिस्थिती त्यांना सांगितली. त्यानंतर हेमंत यांनी त्यांचा व्हॉटसअॅपचा ग्रुप असलेल्या ‘खबरदार’वर वैष्णवीसाठी मदतीचे आवाहन केले. या आवाहनावरुन काही तासातच एक लाखांची मदत वैष्णवीला उपलब्ध झाली.
शंभर रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यतची मदत रत्नागिरीतील अनेक दात्यांनी केली.
पैशांचा हिशोब पारदर्शक पद्धतीने झाला. हिशोब लाईव्ह पाहता येईल अशी व्यवस्था त्यांनी एका लिंकवर केली. त्यात मदत जाहीर करणाऱ्यांची माहिती पाहता येत होती. त्यामुळे जमा झालेली सर्व रक्कम वैष्णवीच्या कुटुंबापर्यत पोहचणार याची खात्री मदत करणार्यांना झाली.
वैष्णवी मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहे. तिच्या आजारासाठी साडेचार लाख कुठून आणायचे असा प्रश्न कुटुंबियासमोर होता. त्यामुळे रत्नागिरी, मुंबईसह अनेक शहरे त्यांनी पालथी घातली. अखेरिस व्हॉटसअॅपच्या ’खबरदार’ ग्रुपवरुन आलेली एक लाखांची मदत त्यांना मिळाली.