मुंबई : कितीही संकट येऊ दे, थांबायचे नाही, अविरत सुरूच राहायचे, फक्त धावायचे, प्रवाशांच्या सेवेसाठी झटायचे, आपला जन्म जणू यासाठीच झाला आहे, हेच प्रमाण मानून सेवा बजावणार्या आणि करोडो चाकरमान्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलेल्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे सेवेने आज १५० वर्षे पूर्ण केली.
सन १८६७ साली पश्चिम रेल्वेवर उपनगरीय लोकल सुरू झाली. १२ एप्रिलला एक उपनगरीय ट्रेन दोन्ही दिशेला विरौर(आताचे विरार) ते बॅक बे दरम्यान धावली होती. वाफेच्या इंजिनावर ती चालवली गेली होती. ही ट्रेन तेव्हाच्या विरौरपासून सहा वाजून ४५ मिनिटांनी बॅक बे साठी रवाना झाली होती. हीच ट्रेन पुन्हा पाच वाजून ३० मिनिटांनी विरौरकडे गेली. प्रवासादरम्यान ती नीला, बसिन, पान्जो, बेरेवला, फादे, अंडारू, सांताक्रूझ, वांद्रे, माहीम, दादर आणि ग्रँटरोड स्थानकांवर थांबली होती, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भास्कर यांनी सांगितले.
१५० वर्षांच्या काळात पश्चिम रेल्वेने कात टाकली आहे. अत्याधुनिक सेवा प्रवाशांना देण्यात येत आहे. ज्यात एटीवीएम, युटीस, सरकते जीने, एलीवेटर, पादचारी पूल आदींचा समावेश आहे, महिला प्रवाशांच्या सुरक्षेलाही प्राधान्य दिले जाते. अशी माहिती भास्कर यांनी दिली. पश्चिम रेल्वेच्या या १५० वर्षांच्या इतिहासात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले तरिही त्यांचा सामना करत पश्चिम रेल्वे उत्तम भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, याकडे भास्कर यांनी लक्ष वेधले.















