मुंबई, (निसार अली) : पश्चिम उपनगरातील समुद्र किनार्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे या किनार्यांना अवकळा आली आहे. मालाड पश्चिमेला मार्वे, अक्सा, दाना पानी, सिल्वर, एरंगळ हे समुद्र किनारे असून या ठिकाणी पर्यटनाच्या कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत. तेव्हा प्रशासनाने त्वरीत या ठिकाणी पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात, या किनार्यांना आंतराष्ट्रीय स्तर लाभण्यासाठी त्यांचा कायापालट करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मार्वे समुद्र किनारा पर्यटन स्थळ असून धार्मिक स्थळ असणार्या प्रसिद्द पागोडा येथे जाण्यासाठी देश विदेशातील पर्यटक मार्वेला येतात. इथून बोटीने प्रवास करत पागोडाला जातात. मुंबईचा गोवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनोरी बेट आणि गोराई जाण्यासाठी पर्यटक मार्वे किनार्याहूनच बोटीने प्रवास करतात. इतके महत्वाचे स्थळ असूनही या किनार्यावर पर्यटकांना आसनाची व्यवस्था नाही. किनार्यावर एका कोपर्यात कचर्याचा डबा आहे. त्यामुळे पर्यटक जागा मिळेल तिथे कचरा टाकत आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. रिक्षावाले पर्यटकांकडून जास्तीचे भाड़े वसूल करत आहेत.
मालाड पश्चिमेतील समुद्र किनारे
मार्वे
अक्सा,
दाना पानी,
सिल्वर,
एरंगळ
नसलेल्या सुविधा
पिण्याचे पाणी,
शौचालय,
कचर्याचे डबे,
बसण्यासाठी आसने
प्रतिक्रिया
या किनार्यांवर राज्य सरकारने पर्यटकांसाठी मुलभुत सुविधा देणे आवश्यक आहे. तसच पालिकेने स्वच्छता राखणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया किरण सोलंकी पर्यटकाने दिली.
मागणी
देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई महत्वाचे बंदर आहे. विदेशी पर्यटक येथे नेहमीच येत असतात. पाश्चिमात्य देशांच्या मानाने पश्चिम उपनगरातील समुद्र किनारे खूपच अस्वच्छ आहेत. शिवाय पायाभूत सुविधांचा येथे पूर्णत: अभाव आहे. पर्यटनाशी आधारित अत्याधुनिक प्रकारच्या सुविधा येथे निर्माण होणे आवश्यक आहे, अशी मागणी येणारे पर्यटक करत आहेत.