मुंबई, विशेष प्रतिनिधी:- कोरोनामुळे ओढवलेल्या लॉकडाऊन स्थितीने अनेकांच्या वजनात वाढ झाली आहे. झोपेत घोरण्याची समस्या निर्माण झाली असून गेल्या आठ महिन्यात हे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे अनेकांची चांगलीच झोपमोड होत आहे.
आपले वजन दररोजच्या आहार विहार व आचार (चांगल्या वाईट सवयी ) यावर अवलंबून असते तसेच काही प्रमाणत अनुवांशिकतेचा सहभाग असतो परंतु सहा ते आठ महिने लॉकडाउन झाल्यामुळे अनेक नागरिकांच्या वजनात वाढ झाली आहे, एका वैद्यकीय अहवालानुसार भारतामध्ये मुख्यतः शहरातील २५ ते ३० टक्के नागरिकांचे वजन हे सरासरीपेक्षा वाढले आहे. या वाढलेल्या वजनामुळे अनेकांना झोपेमध्ये घोरण्याचा त्रास सुरु झाला असून त्यांच्या कुटुंबीयांची झोप उडाली आहे. घोरणाऱ्या व्यक्तीच्या अनारोग्यपूर्ण शारीरिक अवस्थेचं दर्शन घडत असतं. त्यामुळे घोरण्याकडे वेळीच लक्ष पुरवून हा आजार आहे हे मान्य करणं महत्त्वाचं ठरतं; अन्यथा विविध गंभीर आजारांबरोबरच घोरण्यामुळे मृत्यू ओढवण्याचं प्रमाणही मोठं असल्याचं जगभर झालेल्या संशोधनांमधून दिसून आलं आहे.
मुलुंड येथील अपेक्स हॉस्पिटलमध्ये गेल्या महिन्याभरात झोप पूर्ण न झालेले तसेच घोरण्यामुळे श्वसन विकार झालेल्या रुग्णांमध्ये १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याविषयी अधिक माहिती देताना मुलुंड येथील अॅपेक्स हॉस्पिटलचे सल्लागार एमडी फिजिशियन, संसर्गजन्यरोगतज्ञ डॉ. हार्दिक ठक्कर सांगतात, ” घोरणे व शरीरातील अतिरिक्त वजन या दोन बाबी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, कारण घोरण्यामुळे अपुरी झोप होते. अपुरी झोप झाल्यामुळे शरीरातील शक्ती कमी होते व अवेळी भूक लागते. त्यामुळे अनके नागरिक बाजारामध्ये झटपट उपलब्ध असलेले तेलकट पदार्थ म्हणजेच फरसाण, वडा, सामोसा कचोरी व इतर फास्ट फूडचे सेवन करतात व त्यामुळे परत वजन वाढते व ही प्रक्रिया सुरु राहून वजनावर कोणतेच नियंत्रण राहत नाही. जर तुमच्या घोरण्याने तुमची व कुटुंबीयांची झोप अपुरी राहत असेल तर यावर उपचार करून घेणे महत्वाचे आहे. साधारणपणे ८० टक्के नागरिकांमध्ये लठ्ठपणा हे घोरण्याचे कारण आहे तसेच ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनिया या समस्येमुळे घोरण्याचा त्रास होतो. झोपेच्या चार ते पाच तास आधी मद्यपान केल्याने घोरण्याची समस्या वाढण्याची शक्यता आहे
लॉक डाउन काळात अनेक जणांनी मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी मद्यपान व धूम्रपान केल्याचे समोर येत आहे अशा नागरिकांना घोरण्याचा त्रास सुरु झाला आहे. सहा ते आठ महिने घरी राहिल्यामुळे अनेक नागरिकांचे वजन वाढले आहे यामध्ये ५० ते ७० वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे.”
घोरणे व हृदयविकार याचा थेट संबंध सांगताना नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर सांगतात, “न घोरणाऱ्या नागरिकांच्या तुलनेत घोरणाऱ्या नागरिकांमध्ये स्लीप ऍप्नियामुळे मरण पावण्याचा धोका ४० टक्क्यांनी अधिक असतो. कारण घोरण्याचा संबंध हा आरोग्याच्या अनेक समस्यांशी असतो. त्यात हृदयविकारापासून नैराश्यापर्यंतच्या शारीरिक आणि मानसिक आजारांचा समावेश असतो, घोरण्याचा संबंध हा कॅरोटिड अथेरोस्क्लेरॉसिसशी म्हणजेच चरबी साठल्यामुळे गळ्यातील रक्तवाहिन्या अरुंद होण्याच्या आजाराशी असतो आणि यातूनच हृदयविकाराचा जोरदार धक्का येण्याचा संभव असतो. म्हणजेच थोडक्यात, रोज रात्री तुम्ही जितक्या जास्त प्रमाणात आणि दीर्घ काळ घोरत असाल तितका तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची अधिक शक्यता असते. दीर्घ काळ घोरत राहाण्याचा किंवा स्लीप ऍप्नियाचा विकार असलेल्या लोकांमध्ये हृदयाचे ठोके अनियमित पडण्याचा धोका असतो.”
घोरणे थांबविण्यासाठी सुचविलेले सोपे उपाय –
उजव्या किंवा डाव्या बाजूवर झोपणे
कमी उंचीच्या उशीवर झोपणे
वजन कमी करणे
मद्यपान व धूम्रपान थांबविणे
झोपेच्या वेळा पाळणे
रात्रीच्या वेळी कमी आहार