नवी मुंबई, 8 मे : जगभर करोनाचा कहर सुरू आहे.या जीवघेण्या साथी मुळे रोज कष्ट करून पोट भरणारे, छोट्या नोकऱ्या व मजदूरी करणारे जनसमूह प्रचंड त्रास सहन करत आहेत.सर्वत्र बंद असल्याने घरातील शिल्लक धान्य संपलेले आहे व खिशातील पैसेही संपलेले या अवस्थेत उपासमार टाळायची कशी? हा प्रश्न लॉकडाऊन मुळे अधिक त्रासदायक झाला आहे.या काळात अनेक हात मदतीसाठी पुढे येत आहेत. वी नीड यू सोसायटीने ही आपली सामाजिक जबाबदारी अोळखून पुढे आली ,(हि संस्था घणसोली गावात 1986 पासून काम करत आहे.)आता हे काम तुर्भे, कोपरखैरणे येथेही सुरू झाले आहे.
करोनाच्या या अवघड काळात या कष्टकरी कुटुंबांना जेवण देण्याचा उपक्रम संस्थेने सुरू केला 31 मार्च 2020 ते 3 मे पर्यंत 2020 या काळात एकूण 20857 जेवण वाटप केले. या जेवणाचे वाटप ‘नवी मुंबई महानगरपालिका’ घणसोली वॉर्ड कार्यालयाच्या कृतीशील सहभागाने केले जात आहे. हे काम करण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्याअश्विनी मोहिते, कल्पना म्हात्रे, निकिता जांगळे व सहकाऱ्यांनी महत्वाचे कार्य केले.
या कामासाठी संस्थेच्या हितचिंतकांनी मनापासून देणगी दिली त्यातून हे ‘कम्युनिटी किचन‘चालविण्यात येत आहे. लॉकडाऊन काळ सतत वाढवला जात आहे, त्यामुळे मे अखेर पर्यंत कष्टकरी जनसमूहाना मदतीचा हात देण्याचा संस्थेचा मानस आहे.
या कामा व्यतिरिक्तही करोना मुळे प्रभावीत अन्य जनसमूहातील कुटुंबांना रेशन वाटप करण्याचा व आर्थिक मदत देण्याचा ‘वी नीड यू सोसायटीचा ‘ संकल्प आहे.संस्थेतर्फे नागरिकांनी आपली व्यक्तिगत व कुटुंबाची काळजी घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन दिले जात आहे.
मास्क वापरणे, गर्दी न करता किमान सहा फुटाचे अंतर ठेवणे, या काळात ताप, सर्दी खोकला व घशात होणारी खवखव वाटल्यास ते न लपवता डॉक्टरकडे जाऊन तपासणी करावी. तसेच करोना प्रभावीत पेशंट बरे होऊन आल्यास त्यांच्या बरोबर सर्वसाधारण व्यवहार जनतेने करावा, विशेषतः त्यास अपमानास्पद वागणूक न देता, सामावून घ्यावे व विश्वास निर्माण करावा असा संस्थेचा आग्रह आहे.
तसेच समाजातील सांप्रदायिक सदभावना वाढेल असेच प्रयत्न आपण सर्वांनी केले पाहिजेत असे आवाहन ‘वी नीड यू सोसायटीचे’अध्यक्ष डॉ.मकरंद घारपुरे, सचीव श्यामल सोमण, खजिनदार अतुल गोरे व विश्वस्त जयंत कुलकर्णी, कार्यकारी सचीव संजीव साने व इतर सर्व विश्वस्त यांनी केले आहे.