नाटय़कलेशी संबंधित विविध उपक्रम सातत्याने राबविणाऱ्या ‘अस्तित्व’ या संस्थेने नाट्यप्रयोग अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी दोन वर्षापूर्वी सुरु केलेला ‘पॉकेट थिएटर’ हा उपक्रम आता महामुंबईमध्ये यशस्वी होत,विस्तारित होऊ लागला आहे. याच उपक्रमाचा एक भाग आहे. मुंबईत मालाड येथे ‘क्लॅप’ आणि अंधेरी इथे अंधेरी बेस आणि क्रिएटिंग कॅरेक्टर्स आणि ठाण्यात लिओनस वर्ल्ड – रुस्तमजी अर्बेनिया या नावाने छोटी नाटय़गृहे उभारली आहेत. या चारही नाटय़गृहांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नाटक करणारे समूह,हौशी व प्रायोगिक नाटय़संस्था यांच्याकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.कुठलेही भाडे नसलेला आणि किमान तांत्रिक सुविधा,प्रसिद्धी मोफत उपलब्ध करून देणारा सुमारे शंभर ते सव्वाशे आसनक्षमता असलेला छोटय़ा नाटय़गृहांचा प्रयोग यशस्वी ठरला आहे.आतापर्यंत प्रायोगिक नाटकांचे साडेतीनशेहून अधिक प्रयोग सादर झाले आहेत हे विशेष.
यापैकी हिंदी आणि इंग्लिश रंगकर्मींची पंढरी समजल्या जाणाऱ्या अंधेरी इथल्या क्रिएटिंग कॅरेक्टर्स मध्ये मराठी नाट्य उपक्रमांची सुरवात येत्या रविवारी रविवार, १५ जुलैला संध्याकाळी सात वाजता नव्याने सादर होणाऱ्या ’WE-चार ’ या अविस्मरणीय काव्यानुभवाने होणार आहे.
शब्द जुळले म्हणजे कविता येत नाही, आणि कवितेला शब्दांनी बांधता देखील येत नाही. त्यासाठी लागतात काव्यात्मक विचार… ! आणि हे विचार जर चार कवींचे असतील तर त्यातून फुलणाऱ्या कवितांना सुगंध तर येणारच! अशा या काव्यात्मक सुंगंधात रंगून जाण्याची नामी संधी मुंबईतल्या श्रोत्यांना लाभली आहे. मंदार चोळकर, प्राजक्त देशमुख, समीर सामंत आणि विनायक उजळंबे या आजच्या तरुण पिढीतल्या चार वेगवेगळ्या बाजाचे कवी स्वत:चे नाद गंध रुप ढंग घेऊन रसिकांना अविस्मरणीय काव्यानुभवाची सफर घडवण्यास येत आहेत. समीर सामंत आणि मंदार चोळकर या दोन कवींनी मराठी सिनेसृष्टीला अनेक चांगली गीते दिली आहेत. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘यार ईलाही’, ‘दिल कि तपीश, ‘अरुणी किराणी’ अशी उत्कृष्ट गीते समीर सामंत यांनी दिली. ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ हे दुनियादारी सिनेमातलं गाणं असो किंवा ‘नात्याला काही नाव नसावे’ हे ‘मितवा’ सिनेमातलं गाणं असो मंदार चोळकर यांच्या प्रत्येक गीतांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे.
२०११ साली या चार कवींना एकत्र आणत निर्माते सुजित शिंदे यांनी एक अविस्मरणीय काव्यानुभव ’WE-चार ’ रसिकांसमोर सादर केला. विशेष म्हणजे या ‘WE-चार’ ला मान्यवरांची दाद आणि श्रोत्यांच्या उदंड प्रतिसाददेखील लाभला असल्यामुळे, हा प्रयोग नव्याने सादर करण्याच्या उद्देशाने हे चार विचारी कवी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. शायरी,कविता,काव्य आणि गीत अशा या WE-चारांची मैफल श्रोत्यांसाठी सुरेल भेट ठरणार आहे.या कार्यक्रमाची तिकिटे BookMyShow वर तसेच कार्यक्रमस्थळी एक तास अगोदर उपलब्ध आहेत.
‘पॉकेट थिएटर’ उपक्रमातल्या मराठी उपक्रमांच्या या अनोख्या सुरवातीला प्रेक्षक आवर्जून प्रतिसाद देतील असा विश्वास ‘अस्तित्व’ला आहे.