मुंबई : ऑक्टोबर महिन्यातच मुंबईवर जलसंकटाचे सावट आहे. ठिकठिकाणी आतापासूनच पाणी मिळत नाही. पाण्यासाठी बोंबाबोंब सुरु झाल्याची तक्रार नगरसेवकांनी स्थायी समितीत केली. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १ लाख १६ हजार दशलक्ष पाणी पुरवठा कमी असला तरी पाणी कपातीचे टेन्शन मुंबईकरांवर नसेल, असा दावा पालिकेने स्थायी समितीत केला.
मुंबईला रोज ३ हजार ८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी मुबलक पाऊस पडल्याने पाणी कपातीचे संकट मुंबईकरांवर आोढवले नाही. त्यामुळे मागील वर्षी तलावांत १ ऑक्टोबरला १४ लाख ३० हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. यंदा १३ लाख १७ हजार दशलक्ष लिटर म्हणजे जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत १ लाख १६ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा कमी आहे. यंदा जून – जुलै महिन्यांत चांगला पाऊस व ऑगस्टमध्ये काही प्रमाणात पाऊस पडला. मात्र सप्टेंबर महिन्यात पुरेसा पाऊस पडला नसल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत तलावांत पाणी साठा कमी आहे. मात्र तरीही जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. याचा आढावा दर महिन्याला घेतला जाईल, असे पालिकेच्या जलविभागाने स्पष्ट केले. दरम्यान मुंबईत २७ टक्के पाणी गळती, पाणी चोरी होते. हे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र मुंबईत अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे, कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण आहे. त्यामुळे छुप्या पद्धतीने पाणी कपात केले जात नाहीना असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. ए वॉर्डात तर मागील दोन वर्षापासून पाणी कमी दाबाने येते. अधिका-यांकडून पाणी पुरवठा रितसर होत असल्याचे प्रशासनाकडून उत्तर दिले जाते. मात्र हे उत्तर खोटे असल्याचे शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता सानप यांनी सांगत प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान येथील क्रॅास कनेक्शनचे काम हाती घेतले जाणार असून ही तक्रार लवकरच दूर केली जाईल असे आश्वासन प्रशासनाने दिले.
नगरसेविकेच्या घरी घागर उताणी
मागील दोन महिन्यांपासून ए प्रभाग कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. अधिकाऱ्यांकडे याबाबततक्रार केली असता त्यांनी पाणी सुरळीत आहे. पाण्याविषयी येथे कोणतीही तक्रार नाही, असे लेखी उत्तर दिले. त्यामुळे मी पहाटे पाच वाजता अधिकाऱ्यांच्यासोबत प्रभागात फिरुन पाणी पुरवठ्याचा आढावा घेतला. यावेळी पाण्याची समस्या येथे कायम असल्याचे दिसून आले. मी स्वतः स्थानिक नगरसेवका आणि स्थायी समिती सदस्य असतानाही माझ्या घरी पाणी टंचाई आहे. याची अधिकाऱ्यांनाही देखील माहिती असताना त्यांनी खोटी उत्तरे देत दिशाभूल केली आहे. नगरसेविकेला अशी उत्तरे मिळत असतील तर रहिवाशांना काय उत्तरे देणार, असा संतप्त सवाल शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता सानप यांनी करुन प्रशासनाला धारेवर धरले.