प्रकल्प यशस्वी केल्याबद्दल प्रशांत यादव यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
चिपळूण तालुका वकील संघटनेशीही साधला मनमोकळा संवाद
चिपळूण : सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी (ता. १५) पिंपळी येथील वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्धप्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. यावेळी पूर्ण नागरी सहकारी पतसंस्थेच्या ज्येष्ठ संचालिका सौ. स्मिताताई चव्हाण यांनी त्यांचे औक्षण केले.

यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव आणि वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक तसेच चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी मंत्री आशिष शेलार यांचा वाशिष्ठी परिवाराच्या वतीने यथोचित सन्मान केला. यावेळी मंत्री श्री. शेलार यांनी प्रकल्पाची माहिती घेत प्रकल्पातील दुग्धोत्पादनांच्या दर्जाबाबत कौतुक केले. तसेच कोकणात डेअरी प्रकल्प यशस्वी केल्याबद्दल प्रशांत यादव यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी या भेटीदरम्यान चिपळूण तालुका वकील संघाचे पदाधिकारी व सदस्यांशीही मनमोकळा संवाद साधला. यावेळी आमदार प्रमोद जठार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड्. दीपक पटवर्धन, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालिका ॲड्. नयना पवार, वाशिष्ठी डेअरीचे संचालक महेश खेतले, प्रशांत वाजे, अविनाश गुडेकर, वाशिष्ठी डेअरीचे जनरल मॅनेजर लक्ष्मण खरात यांच्यासह वाशिष्ठी डेअरीचे इतर अधिकारी-कर्मचारी तसेच वकील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.














