मुंबई : वाडिया बाल रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया केलेल्या लव आणि प्रिंन्स या सयामी मुलांची मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी बुधवारी (७ फेब्रुवारी) भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला. तसेच ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वितेरित्या पार पाडणाऱ्या डॉक्टरांच्या चमूंचे त्यांनी मुंबईकरांच्यावतीने अभिनंदन केले.
लव आणि प्रिंन्स या सयामी मुलांवर १२ डिसेंबर २०१७ रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या मुलांना आज रुग्णालयातून सुट्टी होणार असल्याने महापौरांनी त्यांच्या पालकांशीही यावेळी संवाद साधला. महापौरांनी यावेळी चार वर्षापूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या रिध्दी – सिध्दी या सयामी मुलींची सुध्दा भेट घेऊन त्यांचे कौतुक केले. वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सयामी मुले व मुलींवर झालेल्या शस्त्रक्रियेची इत्यंभूत माहिती दिली. त्यानंतर महापौरांनी टू डी इको कक्ष तसेच लहान मुलांच्या ह्दयशस्त्रक्रिया विभागाची पाहणी करुन डॉक्टरांशी चर्चा केली. येथील डॉक्टरांनी जागतिक किर्तीचे काम केले असून रुग्णालयाचे काम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे महापौर म्हणाले. त्याचप्रमाणे या सयामी मुला – मुलींना उदंड आयुष्य लाभू दे अश्या शुभेच्छा सुध्दा महापौरांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी एफ दक्षिण व एफ उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष सचिन पडवळ, महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षा सिंधु मसुरकर, नगरसेवक रुपेश वायंगणकर व दत्ता पोंगडे तसेच नगरसेविका उर्मिला पांचाळ हे उपस्थित होते.