मुंबई : बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयातील २०० हून अधिक रुग्णांनी मातीचा किल्ला तयार करून दिवाळी साजरी केली. किल्ले निर्मितीमध्ये सहभागी झालेली सर्व मुले ५ ते १४ या वयोगटातील होती. मुलांनी प्रथमच अशा प्रकारच्या अॅक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतला होता. चिखलात खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटून किल्ला तयार केला. त्यावर पणत्या लावल्या.
“महाराष्ट्रात ३५० हून अधिक किल्ले असून त्यांना मराठी साम्राज्याचा वैभवशाली वारसा लाभला आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही मुलांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश देत आहोत. तसेच मातीने किल्ला तयार करण्याची ही कला मुलांना अवगत व्हावी यासाठी प्रोत्साहन देत आहोत. किल्ला तयार करताना आणि मातीत खेळताना मुलांना खूप आनंद झाला होता.”, असे वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या.
मुलांना हाताने मातीचा किल्ला तयार करण्यास सांगणे म्हणजेच त्यांच्यातील छंदाची ओळख करून देण्याचा मार्ग होता. या माध्यमातून या लहानग्यांमध्ये एक सांघिक भावना विकसित होते. त्याचप्रमाणे मुले इतरांना प्रोत्साहन देण्यास, समस्येवर समाधान शोधण्यास, पर्यायी मटेरिअलचा वापर करून कृती करण्याचा मार्ग निवडण्यास शिकतात. मुलांना विविध किल्ल्यांची रचना समजते आणि त्यांच्याशी निवडीत कथासुद्धा समजतात, असेही बोधनवाला यांनी सांगितले.