मुंबई : पप्पा… हैपी बर्थ डे, पप्पा…असे टाहो फोडून रडणाऱ्या लवेशकडे पाहून विक्रोळी स्मशानभूमीत उपस्थित असणाऱ्यांचे डोळे पाणावले. भीमा कोरेगाव येथे जातीयवादी शक्तींनी केलेल्या दगडफेकीमुळे चिंतामणी मोरे(61) यांच्या वाढदिवशीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्या नातेवाईकांवर आली. वेळेवर उपचार न मिळाल्याने चिंतामणी यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लवेशचे वडील चिंतामणी मोरे नातेवाईकांसह कारने गेले होते. याचवेळी त्यांच्या बसवर दगडफेक झाली. १ जानेवारीला सकाळी ९ च्या सुमारास त्यांची गाडी पार्किंगमध्ये असताना अनेक गाड्या फोडण्यात येत होत्या. हे पाहून मोरे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्राणज्योत मावळली. वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या. जायला मार्ग नव्हता. काय करावे, कळत नव्हते. एका दुचाकीस्वाराकडे मदत मागितली. मग मोरे यांना माझा भाऊ ८ किलोमीटर लांब असलेल्या एका खासगी रुग्णालयात घेऊन गेला. मोरे यांची परिस्थिती नाजूक होती. रुग्णालयाने त्यांना ग्रामीण रुग्णालयात घेऊन जायचा सल्ला दिला. तिथे त्यांची प्राण ज्योत मावळली, घाबरल्यामुळे त्यांना हृदयाचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती घटना घडली त्यावेळी मोरेंसोबत असलेला त्यांचा नातेवाईक अमोल जाधव यांनी दिली. रात्री तणावग्रस्त परिस्थितीत त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोरे यांना बघण्यासाठी आम्ही रुग्णालयाच्या दिशेने निघालो तेव्हा एकदा गाडीवर हल्ला देखील झाला , असे जाधव यांनी सांगितले. मोरे यांच्या मागे २ मुली एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे.