डोंबिवली : 29 एप्रिल रोजी ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान यंत्र ठेवण्यासाठी क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडागृह दोन महिने वापरले जाणारे आहे. दरम्यान तरण तलाव, व्यायामशाळा ऐन सुट्टीत बंद करण्यात येणार आहे. या गोष्टीचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी उद्या बुधवार 20 मार्च रोजी व्यायामपटू घरडा सर्कल येथे रस्त्यावर व्यायाम करून निषेध करणार आहेत.
याबाबत कल्याण येथील कैलास शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन नाराजी दर्शवुन खेळाडूच्या भावना व्यक्त केल्या होत्या. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक आचार संहिता ते मतदान होईपर्यंत दोन महिने व्यायामशाळा व तरण तलाव बंद ठेवण्याचे फर्मान काढले. यामुळे खेळाडूंकडून तीव्र नाराजी दर्शवली जात आहे. या संदर्भात कैलास शिंदे यांनी सांगितले की, ऐन सुट्टीत खेळाडूंना खेळण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी मिळणार नाही. या काळात मोठ्या संख्येने खेळाडू तलावात व व्यायाम शाळेत प्रवेश घेतात व त्याच काळात दोन महिने या वास्तू बंद करणे खेळाडूंवर अन्यायाचे आहे. यामुळे त्याच्यात असंतोष निर्माण झाला आहे.
मतदान सपल्यानंतर मतदान पेट्या बंदिस्त क्रीडा संकुलात न ठेवता बाजूला असलेल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात ठेवल्यास ते अधिक संयुक्तिक होईल. कारण फुले नाट्यगृह सर्व बाजूनी बंदिस्त आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले व याचा गंभीरपणे विचार करावा अशी मागणी केली आहे. याबाबत आपण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले
दरम्यान उद्या (बुधवार, 20 रोजी) सकाळी 8 वाजता सर्व व्यायामपटू घरडा सर्कल येथे रस्त्यावर व्यायाम करून प्रतिकात्मक निषेध करणार आहेत तसेच गरज पडली तर आगामी लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.