डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 62 शास्त्रीनगर डोंबिवली पश्चिमच्या भाजपाच्या नगरसेविका वृषाली रणजीत जोशी यांनी ‘ह’ प्रभागक्षेत्र सभापतीचा पदभार गुरूवारी स्वीकारला. यावेळी प्रभागक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे, उप-अभियंता अनिरुद्ध सराफ, उप-वरिष्ठ लिपिक करुणा म्हात्रे, पथक प्रमुख विजय भोईर यांनी नवनिर्वाचित सभापती वृषाली जोशी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
पश्चिमकडील ‘ह’ प्रभाग क्षेत्राच्या सभापती कार्यालयात झालेल्या पदग्रहण सोहळ्यासाठी भाजपाचे पदाधिकारी माजी नगरसेवक रणजीत जोशी, माजी नगरसेविका रेखा असोदेकर, निशा कबरे, श्वेता धोपटे, मयुरेश शिर्के, पवन पाटील, हर्षद सुर्वे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते आणि कौटुंबिक परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित सभापती वृषाली जोशी म्हणाल्या कि, भाजपाच्या श्रेष्ठींमुळे तसेच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आशीर्वादामुळे मला पुन्हा ‘ह’ प्रभागक्षेत्र सभापती पदावर काम करण्याची संधी मिळत आहे. या प्रभागक्षेत्रातील पायाभूत आणि मुलभूत विकास कामांना प्राधान्य देण्यावर माझा कटाक्ष राहणार आहे. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून गटारे आणि नालेसफाईवर लक्ष केंद्रित करून रस्ते आणि दिवाबत्ती आदी कामे प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येतील. नागरिकांनी त्यांच्या काही तक्रारी असतील त्या अवश्य द्याव्यात त्या सोडविल्या जातील. नागरिकांच्या सहकार्यानेच कामे पूर्णत्वास नेण्यास सोपे जाते आणि विशेष म्हणजे माझे पती माजी नगरसेवक रणजीत जोशी यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा अनुभव मला निश्चितच प्रभाग क्षेत्रातील कामे करण्यास उपयोगी पडेल असेही त्यांनी पुढे सांगितले.