ठाणे : राज्यातील रेल्वे मार्गांलगत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यासंदर्भात राज्याचा वनविभाग आणि रेल्वे विभाग यांच्यात उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे सामंजस्य करार करण्यात आला. राज्यातील रेल्वेमार्गाच्या बाजूला उपलब्ध असलेले क्षेत्र हरीत करण्याची संकल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्यासमोर मांडली होती, त्याला अनुसरून यासंदर्भातील करारावर आज वनमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आजपासून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत राज्यातील वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची एक कार्यशाळा सुरु झाली असून यामध्ये हा करार करण्यात आला.
गेल्या वर्षी १ जुलै रोजी राज्यात २ कोटी ८३ लक्ष इतकी विक्रमी वृक्ष लागवड वनविभागाने केली होती. या विक्रमी वृक्ष लागवडीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकार्डने सुध्दा घेतली होती. राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांनी पर्यंत नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वन आणि वनेतर क्षेत्राची गरज लक्षात घेता राज्यातील रेल्वे विभागाची जमीन वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध व्हावी यासाठी मे २०१५ पासुन त्यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्याकडे वनमंत्र्यांनी पाठपुरावा केला होता तसेच गेल्या वर्षी नवी दिल्लीत यासंदर्भात त्यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती.
या सामंजस्य करारावर सामाजिक वनीकरण विभागाचे महासंचालक चढ्ढा आणि मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता कारला यांनी स्वारक्षरी केली. यावेळी वनविभागाचे सचिव विकास खारगे, रेल्वेचे नंदकुमार आदींसह वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
रेल्वे विभाग आणि वनविभाग यांच्यात झालेल्या. या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रातील रेल्वेचे मोठे क्षेत्र वनीकरणासाठी उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या विक्रमी वृक्ष लागवडीनंतर यावर्षी सुध्दा १ जुलै रोजी ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प शासनाने केला आहे. लोकसहभागाच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील वनाच्छादन वाढविण्याच्या आमच्या या प्रयत्नाला रेल्वे विभागाने केलेले सहकार्य लाख मोलाचे असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली असुन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचे त्यांनी आभार मानले आहे