मुंबई: वॉल्वो कार्सने आज जाहीर केले की त्यांच्याकडून भारतात प्रथमच प्लग इन हायब्रिड कार्सचे असेंब्लिंग सुरु करण्यात येणार आहे. या धोरणाचाच भाग म्हणून वॉल्वोच्या पोर्टफोलिओमधील वॉल्वो एक्ससी90 हे पहिले कार मॉडेल असेल ज्याचे प्लग इन हायब्रिड व्हेरिएंट 2019 च्या अखेरपर्यंत बंगळूरुच्या प्लँटमध्ये असेंबल करण्यास सुरुवात केली जाणार आहे. एक्ससी90 बरोबरच पुढील 3 वर्षांत प्लग इन हायब्रिड्स वाहनांची एक विस्तृत श्रेणी भारतात लाँच करण्यात येणार आहे. या घोषणेच्या माध्यमातून वॉल्वोचा भविष्यातील प्रमुख व्यवसाय हा इलेक्ट्रीफिकेशनवर आधारीत असेल हे स्पष्ट झाले आहे. कंबजशन इंजिन मॉडेल्समधून कंपनीचा प्रवास आता पुढील दिशेने होणार असल्याचेही प्रतीत होत आहे.
#BreatheFree मोहिमेचा भाग म्हणून वॉल्वो कार्सकडून वातावरणात वाढत असणार्या पीएम2.5 लेवलबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अंतर्गतच असोचॅमच्या सहयोगाने एनसीआर मधील शाळा आणि देशभरातील डिलरशिप्समधून बाल दिनाच्या निमित्ताने डीआयवाय क्लिन एअर फिल्टर किट वितरीत करण्यात आली. एअर प्युरिफायर खरेदी करण्याची क्षमता नसणार्या लोकांसाठी ही मोहिम राबवण्यात आली.
कंपनीच्या नवीन धोरणाबाबत माहिती देताना वॉल्वो कार इंडियाचे कार्यकारी संचालक चार्लस फ्रम्प यांनी सांगितले की, “प्लग इन हायब्रिड्सच्या स्थानिक असेंब्लिंगमुळे आम्हाला भविष्यातील इलेक्ट्रिफिकेशन सहजसुलभ होणार आहे. आमचा ग्राहक प्रदुषणाची वाढती पातळी आणि पर्यावरणाचा र्हास याबाबत अधिकाधिक सजग होत आहे. एक जबाबदार कार कंपनी या नात्याने आम्हाला विश्वास वाटतो की, कार्सचे इलेक्ट्रीफिकेशन भविष्यात अनिवार्य बनणार आहे. परंतु आताचा विचार करता प्लग इन हायब्रिड्सचे सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर उपयुक्त पर्याय ठरु शकतो. #BreatheFree मोहिमेच्या माध्यमातून आम्हाला देशातील हवेच्या ढासळत्या गुणवत्तेबाबत जागृती करण्यासाठी मदत होणार आहे. या मोहिमेला मिळत असणारा प्रतिसाद अतिशय उत्साहजनक असून भविष्यात ती आणखी व्यापक स्तरावर राबवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.”
पर्यावरण आणि पर्यायाने इलेक्ट्रीफिकेशनबाबत आपल्या कटीबध्दतेनुसार वॉल्वो हळूहळू पारंपारिक तंत्रज्ञानातून बाहेर येऊन भविष्यात केवळ इलेक्ट्रीफिकेशनवर आपले लक्ष केंद्रीत करणार आहे. 2019 पासून वॉल्वोकडून आपल्या काही मॉडेल्समध्ये इलेक्ट्रीक प्रपल्शनचा वापर सुरु केला जाणार आहे. 2019 नंतर वॉल्वोचे प्रत्येक मॉडेल इलेक्ट्रीफाय पध्दतीचेच असणार आहे.