पुणे : हिंसाचार हा मानवतेचा शत्रू असून आज संपूर्ण जगासमोर हिंसाचाराचा मोठा प्रश्न आहे. परंतु विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य असून डॉ. विश्वनाथ कराड यांनी वर्ल्ड पीस डोम निर्माण करून जगाला शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न करत “वसुधैव कुटुंबकम” या संकल्पनेला मुर्त स्वरूप दिले असल्याचे गौरोद्गार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काढले. लोणीकाळभोर येथील एमआयटी विश्व शांती विदयापीठाच्यावतीने विश्व शांती सभागृह (वर्ल्ड पीस डोम) आणि विश्व शांती ग्रंथालयाचे उदघाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित झाले. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बोलत होते. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, संस्थेचे मार्गदर्शक मंडळाचे चेअरमन डॉ. रघुनाथ माशेलकर, नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर, डॉ. मंगेश कराड, राहुल कराड उपस्थित होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले, जगाला शांततेचा संदेश देण्याची भारताची पंरपरा आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची योग्य सांगड भारतीय संस्कृतीत घालण्यात आली आहे. भारताच्या भूमीत, पाण्यात, हवेत, प्रकाशात ज्ञानाचे तेज आहे. भारतीयांचे हे ज्ञान जगाने मान्य केले आहे. मात्र या ज्ञानात आणि पारंपारिक कौशल्यात वृध्दी होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रगती आणि समृध्दीसाठी शांततेची आवश्यकता आहे. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला शांतता, अहिंसा आणि साधेपणाचा विचार दिला. संपूर्ण जगाने हा विचार स्वीकारला आहे. आजच्या काळातही हा विचार उपयुक्त आहे. भारताच्या प्रत्येक परंपरेमागे विज्ञान आहे. भारतीय परंपरेप्रमाणे माता, मातृभाषा आणि मातृभूमीचा सर्वांनी आदर केला पाहिजे. देशाच्या भल्यासाठी सर्वांनी निसर्ग, संस्कृती आणि एकता जपली पाहिजे.