वसंत वसंत लिमये यांनी स्वत:ची एक लेखन शैली निर्माण केली आहे. कादंबरी वाचताना वाचकांना खिळवत ठेवणे, उत्सुकता वाढविणे, शब्दांचा चपलख वापर ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये म्हणता येतील. सध्या त्यांची ’विश्वस्त’ ही कांदंबरी वाचकांच्या पसंतीस उतरली आहे.
‘लॉक ग्रिफिन’ च्या अभूतपूर्व यशानंतर लिमये यांची ’विश्वस्त’ ही कादंबरी वाचकांच्या भेटीस आली आहे. वर्तमानपत्रे, मीडिया सर्व माध्यमातून कादंबरी विषयीची प्रचंड उत्सुकता वाचकांना लागून राहिली होती. अपेक्षेप्रमाणे उत्तम साहित्य वाचकांसमोर आणण्यास लिमये यशस्वी झाले आहेत.
या कादंबरीत लेखकाने प्राचीन काळ, समकालीन संदर्भ आणि पुरातत्वीय संदर्भाची सांगड घालून वाचकाची रंजकता अगदी शेवटच्या पानापर्यंत वाढवत ठेवली आहे. काळाची चौकट मोडून ऐतिहासिक संदर्भ आणि कल्पना यांचा मिलाफ कांदबरीत उत्तमरित्या जमवून आणता आला आहे.
श्रीकृष्णाची बुडालेली द्वारका आणि द्वारकेचं वैभव यासोबत अनेक महाभारत कालीन गूढ रहस्ये नेमकेपणाने, कौशल्याने उलगडण्यात आली आहेत.
जोआन, अनिरुद्ध, प्रसाद, शब्बीर (शॅबी), मकरंद (मॅक) या पात्रांसोबतच ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणाऱ्या जेफके ग्रुप यांचा वापर करून कादंबरीची मांडणी करण्यात आली आहे. जस्ट फॉर किक चे जेफके हे संक्षिप्त रूप होय.
जेफके टीमला त्यांच्या दुर्गभांडारच्या भटकंतीत एक गोष्ट सापडते, जिथून एक भन्नाट प्रवास सुरु होतो. प्रवासात राजकीय, सामाजिक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संदर्भ येतात. यात स्थळांच्या वर्णनाचा प्रवास अतिशय विस्तारपूर्ण केला गेला आहे.
नाट्यपूर्ण, वेगवान अशी ही कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते. लिमये यांची प्रचंड मेहनत, अभ्यासपूर्ण लिखाण त्यासोबत साधी, सोपी भाषा ही कादंबरीची बलस्थाने आहेत. त्यामुळेच मराठीत उत्तम कादंबर्यांची निर्मिती होत आहे, असा विश्वास ‘विश्वस्त’ने वाचकांच्या मनात निर्माण केला आहे.
पुस्तकाचे नाव : विश्वस्त
लेखक : लिमये वसंत वसंत
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
पृष्ठे : ५४०
किंमत : ५०० रुपये