अलिबाग:- रायगड जिल्ह्यातील अभिजित सिंह कोहली (पळस्पे, पनवेल) आणि कुंदन सुळे (कर्जत) हे युवा तरुण दुचाकीस्वार त्यांच्या सहकाऱ्यांसोबत अभिषेक नलावडे (ठाणे), अंबरीश पुल्ली (पुणे) आणि अजित माळी (सांगली) २५ जानेवारी रोजी पनवेल (पळस्पे) येथील महाऑटोव्हील्स येथून ६ हजार किलोमीटरच्या विश्व शांती परिक्रमा प्रवासाला सुरुवात करणार आहेत.
ते सुमारे २० दिवसात भारतातील सहा राज्ये आणि नेपाळमधील काही ऐतिहासिक ठिकाणांना भेट देणार आहेत. या राईडमध्ये ते भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या जीवनकाळात वास्तव्य केलेल्या सर्व महत्वाच्या स्थळांना भेट देऊन तेथील इतिहास आणि बुद्धांनी दिलेला शांतीसंदेश सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच या प्रवासात दुचाकी चालवताना स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे व वाहतुकीचे नियम पाळणे इत्यादींचे महत्व लोकांना पटवून देण्यासाठी भेटी घेणार आहेत. या प्रवासाचा जागतिक शांती, रस्ते सुरक्षा यांसोबतच पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे असा या तरुणांना विश्वास आहे.
या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये करण्यासाठीही हे तरुण प्रयत्नशील आहेत. यापूर्वीही अभिजित सिंह यांनी आझादी की अमृत परिक्रमा या राईडसाठी दोन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् तसेच हार्वर्ड वर्ल्ड रेकॉर्ड मिळवले आहेत. कुंदन सुळे यांनी भारत के वीर या योजनेसाठी देणगी गोळा करताना ५ हजार ५०० किमीची सुवर्ण चतुष्कोण राईड तसेच LDR Full Throttle सारखे रेकॉर्ड मिळवले आहेत. त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेसोबत स्वच्छता अभियानासाठी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील भाग घेतला आहे. अभिषेक नलावडे यांनीही यापूर्वी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांना एकाच राईडमध्ये भेट देऊन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद केली आहे.
असा अनुभवी संघ सोबत असल्यामुळे विश्व शांती परिक्रमा नक्कीच यशस्वी होईल आणि सर्व उद्दिष्टे पूर्ण होतील हा विश्वास कुंदन सुळे व अभिजित सिंह यांनी पत्र व्यक्त केला.