मुंबई : विक्रोळी कन्नमवार नगर येथील धर्मवीर संभाजी मैदानात थोड्याच वेळात विश्वविक्रम नोंदवला जाणार आहे. तब्बल ११० x ९० फुट आणि ७५ हजार सीडींपासून भव्य असे छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातलं सर्वात मोठे मोझेक पोट्रेट युवा कलाकार चेतन राऊत आणि त्यांची टिम येथे साकारत आहे. एक मे या महाराष्ट्र दिंनापासून त्यांनी ही कलाकृती साकारण्यास सुरुवात केली आहे. आज गुरुवारी रात्री ते पूर्ण होईल, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.
७५ हजार सीडीपासून अशा प्रकारची कलाकृती जगात पहिल्यांदाच साकारण्यात येत आहे. सोमवारी हे मोझेक पोट्रेट साकारण्यास सुरुवात झाली. तब्बल चार दिवसांच्या रात्रंदिवस परिश्रमाने आज ही कलाकृती पूर्ण होईल. राऊत हे वीस जणांच्या टिमसह काम करत आहेत. आमदार सुनील राऊत यांनी त्यांना सहकार्य केले आहे.
कलाकृती साकारल्यानंतर तीन दिवस प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नागरिकानी आतापासूनच गर्दी करायला सुरवात केली आहे. साडे चार लाख इतका खर्च मोझेक पोट्रेट उभारण्यासाठी येणार आहे.
या आधी इंडिगो फेस्टिव्हलमध्ये कॅसेट्सचा वापर करून राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याची भव्य कलाकृती साकारली होती. त्यांच्या या कलाकृतीची लिम्का बुकमध्ये नोंद झाली. आणखी विश्वविक्रम करण्याचा त्यांचा मानस आहे.