
कोल्हापूर : विशाखापट्टणमच्या जवळ LG केमिकल या कंपनीच्या प्लांट मधून विषारी स्टायरिन गॅस बाहेर पडून साधारण 10 लोकांचा बळी घेतला आहे आणि 5000 लोक आजारी पडले आहेत. मृतांची संख्या वाढतच चालली आहे. दुर्घटनेतील बाधितांना वैद्यकीय उपचारासह योग्य नुकसान भरपाई द्या, दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी सिटू चे राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ.सुभाष जाधव यांनी केली आहे.
हा प्लांट लॉकडाऊनच्या काळात बंद होता, मात्र नुकताच सुरू झाला आणि ही दुर्घटना घडली. आसपासच्या तीन किलोमीटरच्या भागातील 5 गावांमध्ये हा गॅस पसरला. यावरून समजलं जाऊ शकतं की काहीही काळजी न घेता हा प्लांट सुरू करण्याची घाई केली गेली आणि त्याची किंमत या गरीब लोकांना मोजावी लागली. या घटनेची अधिक चौकशी झाल्यानंतर गोष्टी अजून स्पष्ट होतील, मात्र हे तर नक्की की हवी तेवढी काळजी घेऊन प्लांट सुरू करण्यात आला नाही, त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस पसरला. लोकांच्या जीवाचा अजिबात पर्वा न करता केवळ कंपनीच्या निर्मितीची पर्वा करणाऱ्या या व्यवस्थेचा तीव्र निषेध करतो, असे जाधव यांनी सांगितले.
या विषारी गॅस मुळे भूगर्भातील पाणी देखील प्रदूषित झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे स्थानिकांना सरकारने तात्काळ साफ पाण्याची सोय करून द्यावी अशी मागणी केल्याचे जाधव म्हणाले.
याआधी देखील एक मोठी दुर्घटना या देशाने 84 साली पाहिली होती ती भोपाळ गॅस दुर्घटनेच्या रूपात. आज त्या घटनेला 35 वर्षांच्या वर उलटून गेली आहेत, मात्र पीडितांना अजूनही पूर्ण न्याय मिळाला नाही. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आज ही दुर्घटना घडली आहे. दरवेळी जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा त्यात गरीबांचाच बळी जातो. कधी त्यात कंपनीच्या मालकांना किंवा मोठ्या अधिकाऱ्यांना नुकसान होत नाही. आणि आपल्या देशात गरिबांच्या जीवाला कमी किंमत दिली जात असल्यामुळे ना तर अशा घटनांची चौकशी होते, ना तर कंपनीकडून हवी तेवढी नुकसान भरपाई वसूल केली जाते. दुर्घटनेतील बाधिताना वैद्यकीय उपचारासह योग्य नुकसान भरपाई द्या. दोषी कंपनीला कठोर कारवाई करा, असे जाधव म्हणाले.