फोटो ओळ- विर्डी धरण प्रकल्पाचा संग्रहित फोटो
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विर्डी लघु पाटबंधारे योजनेस (ता. दोडामार्ग) 145 कोटी 99 लाख 60हजार रुपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात1345 हेक्टर एवढी सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.
या प्रकल्पाचे बांधकाम विर्डी गावाच्या खालच्या बाजूस सुमारे तीन किलोमीटरवर असणाऱ्या गोवा राज्याच्या सीमेलगत हलतर नाल्यावर करण्यात येत आहे. हलतर नाला कर्नाटक राज्यात उगम पावून महाराष्ट्राच्या विर्डी गावातून गोवा राज्यात जातो आणि पुढे मांडवी नदीस मिळतो. महादयी खोऱ्यातील महाराष्ट्राचा हा एकमेव बांधकामाधीन प्रकल्प असून राज्याच्या हिश्याच्या पाणी वापरासाठी 2003-04 च्या दरसूचीवर आधारित 43 कोटी 68 लाख रुपयांच्या किंमतीस सप्टेंबर 2005 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मात्र, भूसंपादन खर्च, संकल्पचित्रातील बदल आणि दरसूची यामध्ये झालेल्या वाढीमुळे प्रकल्पाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यानुसार2013-14 च्या दरसूचीवर आधारित आज सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
या निर्णयामुळे गेली १२ वर्षे प्रलंबित असलेली ही पाटबंधारे योजना मार्गी लागणार असून सिंधुदूर्ग जिल्हयातील दोडामार्ग तालुक्यातील विर्डी, आयी, वझरे, गिरोडे व तळेखोल या पाच गावांतील १३४५ हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार असून परीसरातील गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
विर्डी बृहत लघु पाटबंधारे योजनेची वैशिष्टये
प्रकल्पाची मूळ किंमत ४३ कोटीवरून १४६ कोटीवर
योजनेवर आतापर्यंत ६६ कोटी रूपयांचा खर्च
योजनेमुळे १३४५ हे. प्रत्यक्ष सिंचन निर्मिती, पाच गावांना लाभ