मुंबई : ज्येष्ठ चित्रपट अभिनेते विनोद खन्ना यांचे आज कर्करोगाच्या प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वय ७० वर्ष असणार्या विनोद खन्ना यांच्यावर अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते.
सहा ऑक्टोबर १९४६ मध्ये पेशावर(आता पाकिस्तानात) येथे त्यांचा जन्म एका पंजाबी कुटुंबात झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले.
‘मन का मीत’ या चित्रपटातून विनोद खन्ना यांनी सन १९६८ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. हिंदी चित्रपटसृष्टीत ज्या अभिनेत्यांनी त्यांच्या कारकिर्दिची सुरुवात खलनायक म्हणून केली आणि नंतर अभिनेता म्हणून ते प्रसिद्धीस आले, त्यापेकी विनोद खन्ना एक होते.
‘हम तूम और वो’ या १९७१ मध्ये आलेल्या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना एकामागोमाग सिनेमा मिळत गेले आणि अभिनेता म्हणून त्यांचा प्रवास सुरु झाला. सन २०१५ ला आलेला ‘दिलवाले’ या सिनेमात त्यांनी अखेरचे काम केले होते. त्यांनी राजकारणातही भाग घेतला होता. १९९७ मध्ये विनोद खन्ना राजकारणात सक्रीय झाले. भाजपाचे गुरुदासपुर, पंजाबचे खासदार म्हणूनही ते निवडून आले होते. अध्यात्मिक गुरू ओशो यांचे ते अनुयायी होते. त्यासाठी त्यांनी १९८२ ते १९८६ या काळात सिनेमा क्षेत्रात काम करणे थांबविले होते.