रत्नागिरी, विशेष प्रतिनिधी:- ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी खा. नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले त्या बाळासाहेब ठाकरेंपेक्षा विनायक राऊत हुशार आहेत का? असा सवाल करतानाच बोरकर आणि मोरे यांच्यासह वाचाळवीरांनी खासदार नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यावर आरोप करताना स्वतःला आवर घालावा अन्यथा जशास तसे उत्तर आम्ही देऊ शकतो असा इशारा भाजपाचे संघटन सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिला आहे.
सिंधुदुर्ग येथील एस एस पी एम मेडिकल कॉलेजच्या उदघाटनाला देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या येण्याने संपूर्ण कोकणातील भाजपाला नवीन चेतना मिळाली. वास्तविक या कार्यक्रमात राणे कुटुंबियांकडून कोणावरही वैयक्तिक टीका झाली नव्हती. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाला सिंधुदुर्गसह रत्नागिरीमध्ये उल्लेखनीय यश मिळाले. तर शिवसेनेचे अधःपतन झालेले यावेळी दिसून आले. या नैराश्येतून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी खा. विनायक राऊत यांनी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या टीकेतून खा. राणे आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर कोणताच परिणाम होणार नाही, मात्र आमच्या नेत्यावर जर कोणी अशी टीका केली तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ शकतो हे लक्षात ठेवा असा थेट इशारा भाजप संघटन सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेला भारतीय युवा मोर्चा जिलाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, भाजप सहप्रवक्ता नित्यानंद दळवी, तालुका उपाध्यक्ष अशोक वाडेकर, भाजयुमो उपाध्यक्ष नंदकुमार चव्हाण, संकेत चवंडे, मेहताब साखरकर आदि उपस्थित होते.