राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार रिय़ानरी प्रकल्पाला इथल्या स्थानिक जनतेचा पहिल्या पासून तीव्र विरोध आहे. मात्र हा विरोेध डावलून सध्या हा प्रकल्प रेटण्याच्या तयारीत सरकार आहे. प्रकल्पाला शिवसेनेचा सुरुवातीपासून विरोधात आहे. तरीही सौदी अरेबीयाशी करार करण्यात आला. यामुळे शिवसेना अधिकच आक्रमक झाली असून वर्षावर मुख्यमंत्र्यांना स्वस्थ बसू देणार, प्रकल्प रद्द करण्यासाठी शिवसेना आमदारांना घेवून आपण वर्षा बंगल्यावर धडक देणार, असे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. सौदी अरेबीयाच्या राजपुत्रांचे लांगुलचालन करण्यासाठी हा प्रकल्पाचा घाट घातला गेल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन अगदी दिल्लीपर्यंत संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या निवासस्थानापर्यँत धडक देऊ, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. दरम्यान, आमदार राजन साळवी यांच्यावर दाखल केलेले गुन्हे म्हणजे सरकारची दडपशाही असून हा प्रकल्प लादण्यासाठी मुख्यमंत्री किती उत्सुक झालेले आहेत, हे यावरून दिसते, असा आरोप ही राऊत यांनी केला. प्रशासनाच्या मदतीनेच इथले जमीन खरेदीविक्रीचे व्यवहार चालत आहेत आणि गुजरातहुन जमीन खरेदीसाठी जी भू माफियांची टोळधाड आलेली आहे ती शासनाच्या आशिर्वादामुळेच आलीय असा गौप्यस्फोट ही राऊत यांनी केला. त्यामुळे प्रकल्पाविरोधातील वातावरण आता आणखी तापण्याची शक्यता आहे.