मुंबई : जेट एअरवेजने मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनयदुबे यांची नियुक्ती केली. जेट एअरवेजच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत विनय दुबे यांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली.
आंतराष्ट्रीय व्यापाराचा तीन दशकांचा अनुभव असलेले विनय यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आजवर उल्लेखनीय काम केले आहे. डेल्टा एअरलाइन्स इंक, साब्रेइंक, व अमेरिकन एअरलाइन्समध्ये येथे त्यांनी विविध भूमिका बजावल्या आहेत.
आशिया पॅसिफिकमधील कंपनीचा व्यवसाय पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी विनय यशस्वीपणे नेतृत्व केले, नेटवर्कची पुनरर्चना केली, भागीदारी केल्या, ब्रँड उभारण्यासाठी प्रचंड काम केले आणि त्यांच्या टीमच्या कामाच्या पद्धतीत मोठे परिवर्तन घडवले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी संचालक मंडळाच्या स्तरावरील पदेही भूषवली.
विनय यांच्या नियुक्तीविषयी जेट एअरवेजचेअध्यक्ष नरेश गोयल म्हणाले, “भारतातील विमान वाहतूक क्षेत्र अनेक पटींनी विकसित होण्याच्या टप्प्यामध्ये असताना, आमची उद्दिष्टे पूर्णकरण्यासाठी विनय कार्यकारी व्यवस्थापन समितीचे नेतृत्व करणार आहेत. अलीकडच्या काळात, आम्ही दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उल्लेखनीय प्रगती केली आहे. विनय यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीचा अधिक वाढ व नफा अशा प्रगतीपथावर येण्याचा सध्याचा वेगआणखी वाढेल आणि आमच्या कर्मचाऱ्यांसाठी व भागधारकांसाठी सर्वांगीण फायदा होईल, तसेच एतिहाद एअरवेज या आमच्या भागीदाराशी असलेले नाते अधिक दृढ होईल.”
या नियुक्तीविषयी दुबे म्हणाले, “अंदाजे तीन दशकांनंतर, देशातील प्रीमिअर आंतरराष्ट्रीय विमान कंपनीमध्ये सहभागी होण्यासाठी मी भरतात परत आलो याचा मला आनंद वाटतो. सेवा व हॉस्पिटॅलिटी या बाबतीत महत्त्वाची भारतीय मूल्ये समाविष्ट करणाऱ्या या महत्त्वाच्या भूमिकेची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे, हा माझा सन्मान आहे. कंपनी व कंपनीची परंपरा वाढवण्यासाठी व सक्षम करण्यासाठी, संपूर्ण व्यवस्थापन व कर्मचारी यांच्या मदतीने कंपनीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मी उत्सुक आहे.“