
रत्नागिरी : कोरोनामुळे संचारबंदी असली तरी विनाकारण गाडया घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या काही कमी नाहीये. अशा विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांकडून यापूर्वी हरतऱ्हेने समज देण्यात आली आहे. अगदी कडक कारवाईचा बडगाही उगारण्यात आला. काहींच्या गाडयाही जप्त करण्यात आलेल्या आहेत. मात्र तरीही लोकं नियम तोडून बाहेर विनाकारण फिरतात. अशांसाठी रत्नागिरी पोलिसांनी आता एक नामी शक्कल लढवली आहे. रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिर परिसरात एक ‘सेल्फी’श पॉईंट उभारण्यात आला आहे. विनाकारण गाड्या घेऊन बाहेर पडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांनी फाईन भरून बसवून ठेवलेच, शिवाय या ‘सेल्फी’श पॉईंटसमोर सर्व वाहन चालकांचा सेल्फी घेण्याची वेगळीच शिक्षा दिली.
‘मी घरात न थांबणारा, मी कोरोना पसरवणारा, मीच मूर्ख, मी बेजबाबदार नागरिक, मी ‘सेल्फी’श असा मजकूर या बोर्डवर लिहिण्यात आलेला आहे. या बोर्ड सोबत विनाकारण बाहेर पडणाऱ्या प्रत्येक वाहन चालकांचा सेल्फी घेण्यात येत आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या वाहन चालकांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे.















