रत्नागिरी, (आरकेजी) : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात नाणार-सागावे परिसरात होणार्या प्रस्तावित पेट्रोकेमिकल प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध होऊ लागला आहे. विरोधाची रणनिती ठरविण्यासाठी नाणारमध्ये १५ गावांमधील ग्रामस्थांची बैठक झाली. त्यात शांततेच्या मार्गाने विरोध करण्याचा निर्णय घेतला गेला. परंतु, गरज पडल्यास तीव्र आंदोलन करू, असाही ठराव करण्यात आला. शिवसेनाही विरोधाच्या भूमिकेत आहे आ. राजन साळवी यांनी सांगितले आहे.
जगातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम प्रकल्प कोकणात होणार अशी चर्चा सुरु आहे. गुहागर तालुक्यात तो होणार असे बोलले जात होते. या ठिकाणीही विरोधाचे सूर उमटत होते. प्रशासनही प्रकल्पासाठी जागेची पाहणी करत होते. यानंतर राजापूर तालुक्यातील नाणार, कुंभवडे, सागवे परीसरात प्रकल्प उभारण्यावर शिक्कमोर्तब झाले.
नाणारमध्ये झालेल्या सभेत या प्रकल्पाला शांततेच्या मार्गाने विरोध करण्याचा निर्णय झाला. प्रकल्पामुळे होणारे दुष्परिणाम यावर चर्चा झाली. माजी जिल्हा परीषद सदस्य अजित नारकर, माजी सभापती कमलाकर कदम, येथील आंबा व्यावसायीक उल्हास देसाई, ओमकार देसाई, तारळ सरपंच बाळकृष्ण हळदणकर, नाणार सरपंच गणपत देसाई, सागवे सरपंच बोरकर, कुंभवडे सरपंच पंढरीनाथ मयेकर, विलये सरपंच सौ. परवडी, पडवे सरपंच विनोद मेस्त्री, साखर सरपंच सुचिता कांबळी, विलास कुलकर्णी, जुनेद मुल्ला, विद्याधर राणे, संदेश देसाई, विनोद पेडणेकर, ओमकार पेडणेकर, मनोज देसाई आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होत.
शिवसेनाही विरोधात
शिवसेना ग्रामस्थाच्या बाजूने आहे. आमचाही या प्रकल्पाला विरोध आहे, असे स्थानिक आमदार राजन साळवी यांनी सांगितले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही असेही ते म्हणाले.
पर्यावरणाला धोका : अनिल काकोडकर
राजापूरमध्ये अणू ऊर्जा प्रकल्प होत आहे. अणु ऊर्जा आणि ऑईल रिफायनरी प्रकल्प जवळ असू नयेत, अन्यथा पर्यावरणाचा धोका निर्माण होवू शकतो. असे मत काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी दौऱ्यावर आलेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अणू उर्जा विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. अनील काकोडकर यांनी व्यक्त केले होते.