रत्नागिरी : जयगडमधल्या जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनीविरोधात आज स्थानिकांनी अनोखं आंदोलन केले. जिंदाल कंपनीच्या आवारात कऱ्हाटेश्वराचं मंदिर आहे. मंदिराकडे जाणारी पायवाट कंपनीने बंद केल्याने श्रावणी सोमवारी निघणाऱ्या दिडिंची परंपरा खंडीत झाली आहे. त्यामुळे स्थानिकांनी कंपनीच्या विरोधात भजन-किर्तन करत अनोखं आंदोलन केलं. मात्र सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आल्यांनंतरच या ठिकाणी भिंत बांधण्यात आल्याचं स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आलं आहे.
आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने जयगडमधील कऱ्हाटेश्वराच्या मंदिरातही मोठी गर्दी असते. या मंदिरात जायला पाखाडी असलेली पायवाट आहे. गेली कित्येक वर्ष श्रावणी सोमवारी इथल्या गावातून दिंड्या या पायवाटेने या मंदिरात जायच्या. मात्र सध्या या ठिकाणी जे एस डब्ल्यू पोर्ट कंपनीने भिंत घातल्याने पायवाट बंद झाली आहे. त्यामुळे यावेळी दिंडीची परंपरा खंडित झाली. पाखाडीच्या पायवाटेवर ज्या ठिकाणी मोठी भिंत कंपनीने उभी केली आहे. त्या ठिकाणापर्यत दिंड्या आल्या आणि त्यांनी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात भजन म्हणत या ठिकाणी आंदोलन सुरु केलं. जवळपास दोन तास हे आंदोलन सुरू होतं. या अनोख्या पद्धतीने ग्रामस्थांनी कंपनीचा निषेध नोंदवला.
याबाबत कंपनीचे जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करुनच या ठिकाणी भिंत बांधण्यात आली आहे, तसेच मंदिरात जाण्यासाठी पर्यायी मार्ग सुसज्ज रस्त्यासह आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी गाड्यांची व्यवस्थाही करण्यात आल्याचं स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आलं.