अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि जीवे मारण्याचा केला प्रयत्न
मुंबई : घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार टागोर नगर येथे मंगळवारी घडला. घटनेनंतर स्थानिकांनी आरोपीस पकडले आणि विक्रोळी पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतु, पोलीसांच्या निष्काळजीपणामुळे तो पोलीस ठाण्यातून पळून जाण्यास यशस्वी ठरला. संन्यासी उदय बेहरा(वय- 40) असे त्याचे नाव आहे, विक्रोळी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
टागोर नगर येथील संजय गांधी विभागात बेहरा आला होता. याचवेळी मुलगी घरात एकटी असल्याचे त्याला समजले. तो घरात घुसला आणि तिचा विनयभंगकेला. प्रतिकार करताच त्याने तिला फिनाईल पाजले आणि पळ काढला. यानंतर आरडाओरडा करत मुलगी घराबाहेर येऊन बेशुद्ध झाली. स्थानिकांनी तिला महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शुद्धीवर आल्यावर तिने केलेल्या वर्णनावरून ती व्यक्ती बेहरा असल्याचे स्थानिकांना समजले आणि त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
तो हाच आरोपी आहे का? याची शहानिशा मुलीसमोर करून घ्या, अशी विनंती मुलीच्या आईने पोलिसांना केली. तेव्हा, आम्ही इतर केस पाहत आहोत, नंतर घेऊन येऊ असे पोलिसांकडून सांगितले गेले. बराच वेळ झाला तरी आरोपीला पोलीस, रुग्णालयात आणत नाहीत, म्हणून स्थानिक पुन्हा विक्रोळी पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी तो पोलीस ठाण्यातून पळाला, असे पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले.
या प्रकाराबाबत विक्रोळी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला गेला आहे, अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.