मुंबई, 11 मे : विक्रोळीतील प्रसिद्ध डेंटिस्ट डॉक्टर सुनील तोरणे यांचे अल्पशा आजाराने मध्यरात्री निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. ईशान्य मुंबईत सामाजिक कार्यात नेहमीच ते पुढाकार घेत. त्यांनी बहुजन समाज पक्षाकडून लोकसभेची निवडणूक देखील लढविली होती.
निष्णात डॉक्टर अशी त्यांची ओळख होती. सामाजिक बांधिलकीतून ते व्यवसाय करत. अनेक वेळा गरीब रुग्णांना मोफत सेवा देत. सामाजिक चळवळीत ते सक्रिय होते. त्यांच्या जाण्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.
डॉक्टरांच्या निधनावर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सूर्याजी कांबळे यांची प्रतिक्रिया :
विक्रोळीत असताना मी आणि अरुण रावले ‘अस्तित्व परिवार ‘ नावाने संस्थात्मक काम करायचो. आमच्या सोबत डॉक्टर ही असायचे.
अभ्यासिका,व्याख्याने,एकलव्य पुरस्कार,अभ्यास सहली,शालेय शिष्यवृत्ती,ग्रंथालय असे अनेक उपक्रम राबवायचो आणि शाक्यसिंह प्रकाशन अंतर्गत ‘अस्तित्व परिवार’ नावाने एक हस्तलिखित सुद्धा.
या हस्तलिखिताचं छापिल त्रैमासिकात,पुढे मासिकात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत डॉक्टर साहेबांचा सिंहाचा वाटा होता.
बहुजन समाज पार्टी, मान्यवर कांशीराम साहेब , बहन मायावती जी यांच्या प्रेमात पडलो ते डॉक्टर साहेबांमुळेच .
डॉ.सुनिल तोरणे म्हणजे हरहुन्नरी, तजेलदार, सळसळतं व्यक्तिमत्व. शिकायची प्रचंड तृष्णा. गाणं, तबला, व्हायोलिन, लिहिणं (अनेक लेख आणि आरक्षणावर ची पुस्तिका), वाचणं, चर्चा करणं, IAS बनण्यासाठिची धडपड, राजकारण (ब.स.पा.चे प्रामाणिक कार्यकर्ते आणि लोकसभा उमेदवार), समाजकारण(अस्तित्व परिवाराच्या उपक्रमांत सहभाग ), अर्थकारण( सम्यक पतपेढी) आणि आता कायद्याचं शिक्षण …..
पेशाने निष्णात डॉक्टर. अनेक वेळा इतर खाजगी रुग्णालयांत आॅपरेशनच्या वेळी मी जायचो त्यांच्यासोबत. त्यांनी ठरवलं असतं तर ते श्रीमंत व्यावसायिक डॉक्टर नक्कीच झाले असते,पण ते तर सामाजिक बांधिलकीच्या प्रेमात होते.
रोखठोकपणा हा त्यांचा विशेष गुण. चुक ते चुक आणि योग्य ते योग्यच हे बोलायची धमक असणारा राजा माणूस म्हणजे डॉ. सुनिल तुकाराम तोरणे.त्यांच्या प्रेमातही एक रांगडेपणा होता. त्यांच्या कडून आर्थिक आणि इतर मदत घेतलेल्यांची संख्या मोजता न येणारी.
इतक्या लवकर त्यांचं निघून जाणं अनपेक्षितच ! निर्वाण यात्रेत सहभागी होता येत नसल्याचं दु:ख आहेच.
बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर-कांशीराम या महान क्रांतिसूर्यांवर निस्सिम प्रेम करणारे, त्यांच्या विचारांचा पाठपुरावा करणारे डॉ.सुनिल तोरणे साहेब यांचं निर्वाण ह्रदयाला चटका लावून गेलं, असे सूर्याजी कांबळे यांनी म्हटले आहे.
प्रसिद्ध चित्रकार रजनिनाथ लुडबे म्हणतात : “आपत्या तत्वांशी प्रामाणिक राहणारा अत्यंत कुशल असा डाँक्टर व प्रामाणिक मित्र. विकास हायस्कूलचा विद्यार्थी गरीबीतून डॉक्टर होऊन गरीबांसाठी तळमळीने काम करणारा निस्पृह डाँक्टर “