मुंबई : विक्रोळी येथे राहणाऱ्या दर्शना गोवेकर-गायकवाड आणि नताशा पांगे यांनी यावर्षी आपल्या घरच्या गणपतीसाठी अतिशय आगळावेगळा आणि जनजागृती करणारा देखावा साकारला आहे. शहराचा विकास कराल मात्र झाड नसतील तर श्वास कसा घ्याल असा संदेश या देखाव्यातून गोवेकर कुटुंबीयांनी दिला आहे. यासाठी कुटुंबातील प्रत्येक जण मागील महिनाभर अहोरात्र कष्ट घेतले.
मुंबई शहराचा विकास होत आहे, यामध्ये अनेक प्रकल्प राबवले जात आहे पुनर्विकास असे विविध प्रकल्प शहरामध्ये सुरू आहे मात्र हे काम करत असताना यामध्ये अडथळा येणाऱ्या झाडांचा बळी दिला जातो. वृक्ष तोडीविरोधात कायदे बनवण्यात आले आहेत. मात्र याचे पालन योग्य रीतीने होताना दिसत नाही. वृक्ष तोडीचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे या सजावटीच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. यासाठी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करण्यात आलेला आहे. त्याबरोबरच झाडे संवर्धनाचा संदेश यावेळी देण्यात आला आहे. आरेमध्ये होणाऱ्या मेट्रो कारशेडवर देखील या सजावटीमध्ये भाष्य करण्यात आले आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे, यासाठी मोठ्या संख्येने झाडांची कत्तल करण्यात येते. मात्र जर झाडे नसतील आपला विकास करून काय फायदा आहे. आपण श्वास घेणार कसा? आपल्याला प्राण वायू देखील विकत घ्यावा लागेल यामुळे आता बाप्पा तूच मानवाला काही तरी शिकव असा संदेश मी या सजावटीच्या माध्यमातून दिला असल्याचे दर्शना गोवेकर- गायकवाड यांनी सांगितले.