मुंबई : मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे स्नेहसम्मेलन मोठ्या उत्साहात विक्रोळीतील संदेश महाविद्यालयात नुकतेच साजरे झाले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच शिक्षकांच्या चळवळीवर भाष्य करण्यात आले. टीडीएफ, शिक्षक मित्र आणि आदर्श शिक्षक सेवा संघ यांच्या माध्यमातून संमेलन घेतले गेले.
प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी कर्मचारी नेते मिलिंद सरदेशमुख, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते निसार अली, माजी मुख्याध्यापक व समाजसेवक शिवाजी सानप, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब म्हात्रे यांच्यासह विविध शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
निसार अली, जनार्दन जंगले, राजेश सिंह यांनी शिक्षण क्षेत्रात जाणवणार्या समस्या मांडल्या आणि राज्य सरकारच्या शिक्षणविरोधी धोरणाविरुद्ध शिक्षकानी आंदोलनाला तयार रहावे, असे आवाहन केले. तसेच चुकीच्या शिक्षक आमदारामुळ शिक्षक चळवळ उतरंडीला लागली आहे, ती वाचवायला हवी, असेही सांगण्यात आले.
कंत्राटी करणाविरुद्धच्या आंदोलनात शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मिलीद सरदेशमुख यांनी केले. सातव्या वेतन आयोगासाठी नियुक्त केलेल्या बक्षी समितीसमोर सरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीने आपले म्हणने मांडले आहे. शिक्षक संघटनानी त्यांचे मुद्दे समन्वय समितिकडे पाठवावेत. बक्षी समितीसमोर ते मुद्दे शिफारशीसह पाठविण्यात येतील, असे सरदेशमुख म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी कुलाळ यांनी केले. आभार लालजी कोरी यांनी मानले. संदेश विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.