
मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी) – विक्रोळी येथील लालबहादूर शास्त्री मार्गापासून पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा उड्डाणपुल आता वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या पुलाच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी होत असल्याने वाहनचालक वेळ वाचविण्यासाठी गांधी नगर येथील उड्डाणपुलाचा वापर करीत आहेत. वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार संजय दिना पाटील यांनी वरिष्ठ पोलीस आणि पालिका अधिका-यांना या ठिकाणी पाहणी करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्याप्रमाणे प्रशासकीय अधिकारी, आमदार सुनिल राऊत, युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांनी विक्रोळी येथे वाहतुक कोंडीची पाहणी केली.
यावर तोडगा काढण्यासाठी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांना या ठिकाणी पाहणी करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे आज दुपारी वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त प्रदिप चव्हाण, पालिका अधिकारी तसेच आमदार सुनिल राऊत व शिवसेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांनी पाहणी केली. त्यामुळे लवकरच वाहतुक कोंडी सुटण्यासाठी उपाययोजन करतील अशी अपेक्षा नागरीकांना वाटत आहे.
दरम्यान, या ठिकाणी वाहतुक पोलिसांची संख्या वाढविण्यात यावी, दोन्ही ठिकाणी सिग्नल यंत्रणा लावण्यात याव्यात, रस्ता रुंद करण्यात यावा, उड्डाणपुलावर रस्ता दुभाजक लावण्यात यावा या सारख्या सुचना खासदार संजय दिना पाटिल यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
















