मुंबई : बेकायदेशीरपणे होत असलेल्या गर्भपाताच्या संशयावरून विक्रोळीतील टागोरनगर येथील रुबी मेडिकल सेंटरमध्ये बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाने(एफडीए) धाड टाकली. यावेळी गर्भपाताशी संबधीत अनेक संशयास्पद वस्तू अधिकार्यांना सापडल्या. गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या एमटीपी गोळ्यांची अकरा भरलेली किट्स आणि पंधरा रिकामी किट्स जप्त करण्यात आली. याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात एफ़डीएने तक्रार नोंदविली आहे.
या रुग्णालयात गर्भाशी संबंधित सहा रुग्ण उपचारासाठी दाखल असल्याचे आढळले. येथील एक महिला डॉक्टरची पदवीदेखील आयुर्वेदातील एमडी आहे. त्या बेकायदेशीररित्या रुग्णांवर उपचार तसेच गर्भपात आणि शस्त्रकिया करीत आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांना मिळाली होती. यानंतर विक्रोळी पोलिसांच्या सहकार्याने रुग्णालयावर छापा टाकण्यात आला.
तपासणीत गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे, बिले नसलेली औषधे आणि गर्भविकारांचे काही रुग्ण आढळले. अधिकाऱ्यांनी सर्व औषधे जप्त केली. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या डॉक्टर महिलेला गर्भाशी संबंधित तसेच स्त्री रोगाशी संबंधित रुग्णांना औषधोपचार तसेच शस्त्रकिया करण्याची परवानगी नसताना या रुग्णालयात हा प्रकार कसा सुरू होता? गर्भपाताशी संबंधित गोळ्यांचे काय केले गेले? याची चौकशी सध्या सुरु आहे.
रुग्णालयाचा परवाना रद्द करणे आणि गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांना नोटीस पाठविण्यात येणार आहे, असे एफ़डीएतील सुत्रांनी सांगितले. रुबी मेडिकल सेंटर प्रशासनाकडून या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देण्यास कोणीही उपलब्ध झाले नाही.