
अपहृत मुलाच्या पालकांसह विक्रोळी पोलीस ठाण्यातील अधिकारी.
मुंबई : लग्नाचा खर्च करता यावा, यासाठी शेजारीच राहणाऱ्या पाच वर्षाच्या बालकाचे अपहरण करणार्या तरुणीला विक्रोळी पोलिसांनी अवघ्या तीन तासात अटक केली. या तरुणीने मुलाच्या पालकांकडे दोन लाखाची खंडणी मागितली होती. पुष्पा कटारिया( वय-२७) असे तिचे नाव आहे. हा प्रकार गुरुवारी संध्याकाळी घडला.
कमलादेवी प्रजापती तिच्या दोन मुलांसोबत पुष्पासोबत टागोर नगर येथील त्रिकोणी उद्यानात आली होती. यावेळी लहान मुलाला शौचाला आले, म्हणून त्याला घरी घेऊन गेली आणि मोठा मुलगा रिषभ याला तिने पुष्पाकडे सोडले. काही वेळाने पुन्हा कमलादेवी उद्यानात आली तेव्हा मुलगा आणि पुष्पा दोघे ही तेथे नव्हते. पुष्पाचा फोनही बंद झाला होता. काही वेळाने रिषभचे वडिल हंसाराम यांना पुष्पाने आवाज बदलून फोन केला आणि मुलगा सुखरूप हवा असेल तर दोन लाख रुपये द्या, अशी खंडणी मागितली. यानंतर त्यांनी तातडीने विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सुरुवातीला पुष्पा आणि रिषभ यांचे अपहरण झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला.
विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर हंचाटे यांनी पोलिसांच्या तीन टीम बनवून शोध सुरू केला. याचवेळी पुन्हा हंसाराम यांना फोन आला. त्यांना दादर येथे पुष्पाने बोलावले. पोलिसांचे पथक तेथे तातडीने रवाना झाले. परंतु, पुष्पांने हंसाराम यांना कुर्ला आणि नंतर कल्याण येथे बोलावले. याच दरम्यान पोलिसांनी मोबाईल नंबर कोणाचा आहे ? याचा शोध घेतला. तेव्हा त्याच विभागातील ललिता दामोदरन यांच्या नावाचे ते सिम कार्ड असल्याचे त्यांना समजले. निवडणुकीमध्ये पोलिंग एजन्ट बनवते, असे सांगत पुष्पाने तिचे कागदपत्र घेऊन सिमकार्ड घेतले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या वेळी पोलिसांनी या क्रमांकावरून येणाऱ्या फोनचा मागोवा घेतला. तेव्हा नाहूर रेल्वे स्थानकाजवलून फोन येत असल्याचे कळाले. मुलगा आणि पुष्पाचे छायाचित्र यांच्या आधारे पोलिसांनी नाहूर रेल्वे स्थानकात सापळा रचला, आणि पुष्पाला अटक करून मुलाला ताब्यात घेतले.
लग्नासाठी पैशाची गरज होती तसेच दूरचित्रवाणी वाहिनीवर सुरू असलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भातील मालिका पाहून अपहरणाची कल्पना सुचली, असे पुष्पाने पोलिसांनी सांगितले. तिला न्यायालयात हजर केले असता ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.