.
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी औद्योगिक कामगारांच्या वसाहतीचे स्वप्न पाहिले आणि विक्रोळीत कन्नमवार नगर आकारास आले. मारोतराव कन्नमवार यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून कन्नमवार नगर येथे माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे स्मारक उभारण्याची मागणी जनता दल सेक्युलर राज्य सरकारकडे करणार आहे, अशी माहिती पक्षाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर आणि ईशान्य मुंबई अध्यक्ष संजीवकुमार सदानंदन तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गायकवाड यांनी दिली.
कन्नमवार नगर येथे कामगार कल्याण भवन आहे. या भवनाच्या बाजूला राज्य सरकारचा भूखंड आहे. या जमिनीवर जलतरण तलाव होणार होते. आंतरराष्ट्रीय तरण तलाव बांधण्याच्या वल्गनाही करण्यात आल्या होत्या. मात्र, दोन वेळा भूमीपूजन होऊनही तरण तलाव होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. हा भूखंड असाच पडून आहे.
या जमिनीवर मारोतराव कन्नमवार यांचे स्मारक उभारण्यात यावे, असे जनता दलाचे म्हणणे आहे. कष्टकरी वर्गातील मुलांसाठी या ठिकाणी अल्प दरात विविध प्रकारचे इनडोअर गेम्स उपलब्ध करता येतील. तसेच स्पर्धा परीक्षा वर्ग, आधुनिक कामगार रंगभूमी, कामगार संघटना किंवा कामगार चळवळीत काम करू शकणाऱ्यांसाठी अभ्यास वर्ग आदी अनेक समाजोपयोगी उपक्रम या ठिकाणी राबवले जाऊ शकतात, असे नारकर यांनी म्हटले आहे.
मारोतराव कन्नमवार यांच्यामुळे एक आदर्श म्हाडा वसाहत विक्रोळीत कन्नमवार नगर या नावाने उभी राहिली. यामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित आयुष्य लाभले. म्हणूनच मारोतराव कन्नमवार यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून स्मारक उभे राहिलेच पाहिजे, असे नारकर यांनी म्हटले आहे.
या रिकाम्या भूखंडावर विकासकांचा डोळा असून सरकारी यंत्रणांना हाताशी धरून ही जमीन लाटली जाण्याची शक्यता आहे. परंतु, विक्रोळीतील सर्वसामान्य जनतेला सुविधा देण्यासाठी या जागेचा वापर व्हावा, अशी जनता दलाची अपेक्षा आहे. कन्नमवार नगरात मोठ्या प्रमाणावर इमारतींचा पुनर्विकास होत आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आधुनिक स्मारक उभारले गेले पाहिजे, असे नारकर म्हणाले.
ईशान्य मुंबईतील नागरिकांना या स्मारकाचा लाभ मिळू शकेल. तसेच पूर्व द्रुतगती मार्ग लागूनच असल्याने लोकांना ये-जा करणेही सोयीचे आहे. सध्या इन डोअर गेम्ससाठी असणाऱ्या कोर्सच्या किमती पाहता सर्वसामान्यांना त्या परवडणाऱ्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी कामगार, कष्टकऱ्यांसाठी इनडोअर गेमची सुविधा असलेले मारोतराव कन्नमवार यांचे बहुउद्देशीय स्मारक झाले पाहिजे, असे संजीवकुमार सदानंदन यांनी सांगितले.
तर ४० वर्षांहूनही अधिक काळ हा भूखंड पडून आहे. प्रारंभी या ठिकाणी जलतरण तलाव होणार होता. तो आता होणारही नाही. त्यामुळे कष्टकरी, कामगार, त्यांची मुले यांचा सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त होईल, असे स्मारक या ठिकाणी झाले पाहिजे, अशी मागणी प्रशांत गायकवाड यांनी केली.














