मुंबई : भरधाव वेगाने वाहन चालविणार्या मोटारचालकामुळे दोन जणांचे प्राण जाण्याची घटना विक्रोळीतील बिंदुमाधव ठाकरे या रहदारीने व्यस्त चौकात घडला. या अपघातात रिक्षाचालक पुरुषोत्तम प्रभू(४५) आणि प्रवासी लुसी डिसोजा(६८) ठार झाले. तर लुसी यांचा मुलगा जॉन गंभीर जखमी झाला आहे. विक्रोळी पोलिसांनी भाविक छाडवा (२२) या वाहनचालकाला अटक केली. रविवारी सकाळी ८ वाजून १५ मिनिटाला ही घटना घडली.
छाडवा याच्या चुकीमुळे दोन कुटुंबावर आघात झाला आहे. प्रभू हे रिक्षाव्यवसाय करून कुटूंब सांभाळत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आठ वर्षाचा मुलगा आहे. तर डिसोजा कुटूंबाने अपघातात आईला गमावले आहे.
विक्रोळी पश्चिम चर्चमधून प्रार्थना करून लुसी आणि त्यांचा मुलगा जॉन हे प्रभू यांच्या रिक्षातून घरी परतत होते. बिंदुमाधव चौकात त्यांची रिक्षा सिग्नल लागल्यामुळे टागोर नगरच्या दिशेकडे थांबली होती. त्यावेळी भरधाव मारुती रिट्झने त्यांना जोरदार धडक दिली. पुढील टेम्पोवर रिक्षा आदळली. लुसी जागीच ठार झाल्या तर प्रभू आणि जॉन यांना पालिकेच्या फुले रुग्णालयात दाखल केले गेले. उपचारापूर्वीच प्रभू मरण पावले. जॉन यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. टेम्पोचालक मोहम्मद सुरई(४३) हे देखील जखमी झाले आहेत.
विक्रोळी पोलिसांनी वाहनचालक भारतीय दंड संहितेनुसार आरोपी छाडवा याच्याविरोधात ३०४(अ),२७९, ३५८, १८४ या कलमांखाली गुन्हा दाखल करून अटक केली.
शिवसेनेची प्रभू कुटूंबाला मदत
शिवसेना आमदार सुनील राऊत हे प्रभू यांच्या मुलाचा शैक्षणिक खर्च उचलतील, अशी माहिती उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांनी दिली. तसेच लुसी डिसोझा या उपशाखाप्रमुख अॅंथनी यांच्या आई होत्या, त्यांच्याही निधनाबाबत राऊत यांनी शोक व्यक्त केल्याचे जाधव म्हणाले.
बॉम्बे कॅथॉलिक सभेचाही मदतीचा हात
रिक्षाचालक प्रभू यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यांच्या मुलाच्या पुढील शैक्षणिक खर्चासाठी बॉम्बे कॅथॉलिक सभाही मदत करेल, अशी माहिती सभेचे उपाध्यक्ष रॉबर्ट डिसोझा यांनी दिली.