रत्नागिरी : कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी रत्नागिरीत प्रथमच पर्यटन, मत्स्य, आणि आंबा व्यवसायिक क्षेत्रातील मंडळी कोकण विकास यात्रेच्या झेंड्याखाली एकत्र आले. शेकडोंच्या संख्येने दुचाकी व चारचाकीस्वारांचा सहभाग असलेली ही यात्रा हातखंबा ते रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली. कोकणच्या विविध मागण्यांसाठी पहिला टप्प्यातील हे आंदोलन रत्नागिरीतून सुरू झाले आहे.
हातखंब्यातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सोमवारी दुपारच्या सुमारास ही विकास यात्रा काढण्यात आली. दरम्यान माळनाका येथील विवेक हॉटेलच्या सभागृहात कोकण रोजगार हक्क परिषद पार पडली. त्यावेळी कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव, कार्याध्यक्ष किशोर धारिया, ग्लोबल कोकणचे कार्याध्यक्ष राजीव पाटील यांच्यासमवेत समन्वय समिती रत्नागिरी कार्याध्यक्ष कौस्तुभ सावंत, विकास शेट्ये, शामकांत खातू, बिपीन पाटणे, नरेश पेडणेकर, सतिश कदम, प्रमोद केळकर, युयुत्सू आर्ते, ऍड. रुपेश गांगण, जगदीश ठोसर, शिरिष झारापकर, प्रकाश देशपांडे, मीनल ओक आदींची उपस्थिती होती. जिह्यातील 100 विविध संस्था आणि 65 लोकांची कोअर कमिटीने या विकास यात्रेचे नियोजन केले होते.
कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे कोकणच्या विकासाचे संघटीत अभियान व लोकचळवळ राबवण्यात येत आहे. कोकणातील लोकांना कोकणातच रोजगार उपलब्ध व्हावा, पर्यटन, मत्स्य, कृषी आदीमध्ये प्रकल्प उभारणीस सुलभपणे परवानग्या मिळाव्यात, कृषी मालास हमीभाव मिळावा यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठान व समृद्ध कोकणच्या वतीने कोकण महाआंदोलन होणार आहे. जिल्हास्तरावर आंदोलन व मुंबईमध्ये मुख्य आंदोलन होणार आहे. त्याची झलक 17 जून रोजी रत्नागिरीत पहावयास मिळून आली. यात्रेदरम्यान झालेल्या कोकण विकास परिषदेनंतर ही विकास यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली. त्याठिकाणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना कोकणातील प्रश्नांसंदर्भात निवेदन देण्यात आले. या आंदोलनामध्ये शेकडों शेतकरी, विद्यार्थी, कोकणवासीयांचा सहभाग लाभला होता. चुकीच्या शासकीय धोरणांविरुद्ध हा आंदोलनाचा आवाज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.