कोल्हापूर : जग आता एका मानवनिर्मित संकटात सापडलेले आहे, मानवाने जागतिक तापमानवाढीचा विचार करून तातडीने उपाय करण्याची गरज आहे. अन्यथा आपला विकास विनाशाकडे घेऊन जाईल, असे मत पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले. ते सकाळ चे संस्थापक – संपादक पत्रमहर्षी डॉ. ना. भि. तथा नानासाहेब परूळेकर यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी आयोजित व्याख्यानात शाहू स्मारक भवन येथे बोलत होते.
विकास म्हणत म्हणत आपण जंगल नष्ट करत आहोत, निसर्ग संपदा खरवडून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा परिपाक म्हणजे महापूर, दुष्काळ असून निसर्गाचा ऱ्हास त्वरित थांबविण्याची गरज आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडे पर्यावरणाबाबत कुठलेही धोरण नाही, प्रशासन सर्व नियम धाब्यावर बसवून पर्यारणाची लूट करण्यास परवानगी देत आहे. परंतु हवामान बदलामध्ये बळी जातो तो गरीबाचा आणि लहान मुलांचा. विनाशाकडे घेऊन जाणाऱ्या विकासाला आपण बदलण्याची गरज आहे. आता त्वरीत कृती तरी करण्याची गरज असून कार्बन उत्सर्जन रोखणे हे आपल्यापुढील आव्हान आहे. त्यासाठी आपण सामिल होऊयात, स्वत: पासून सुरूवात करूयात. कोल्हापूर ने यामध्ये पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.
यावेळी निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी अतुल देऊळगावकर यांचा सत्कार केला. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले.