मुंबई : मुंबई विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व लायन्स क्लब ऑफ मिलेनियम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात विक्रोळी येथील विद्या विकास एज्युकेशन सोसायटी संचालित विकास कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास विक्रमी रक्तदान झाल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. दि. २० ऑगस्ट २०१८ रोजी मुंबई विद्यापीठाच्या मराठी भाषा भवनामध्ये आयोजित समारंभात पारितोषिक वितरण करण्यात आले.
विकास महाविद्यालयात प्रतिवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते व या शिबिरामध्ये विक्रमी रक्तदान करण्यात येते. या एका उत्तम संस्काराला चालना देण्याचे कार्य विकास महाविद्यालयाचे एन.एस.एस. युनिट गेले २१ वर्षे अविरतपणे पार पाडत आहे. याहीवर्षी ८९३ बाटल्या विक्रमी रक्तदान झाले. या कार्याची दखल घेऊन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते विकास महाविद्यालयाचे एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. विनायक मुळे यांना करंडक व पन्नास।हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक प्रा. बी.एस. बिडवे व लायन्स क्लबचे मनमोहन मेहता व डॉ. दीपक चौधरी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष प.म. राऊत, संचालक डॉ. विनय प. राऊत,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.पात्रा यांनी महाविद्यालयाच्या एन.एस.एस.युनिट, विद्यार्थी, लायन्स क्लब व रक्तदात्यांचे अभिनंदन केले आहे.