रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष व शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख विकास केशव चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली. मंडणगड तालुक्यातल्या गांधी चौक येथील स्मशानभुमी शेजारी असलेल्या विहीरीत उडी मारुन त्यांनी जीवन संपविले. विहरीत उडी मारण्यापुर्वी विहीरीच्य कठड्यावर त्यांनी आपली चप्पल, चष्मा, छत्री व चिठ्ठी लिहून ठेवली होती. चव्हाण यांनी मृत्यूपुर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.
चव्हाण यांनी विहीरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचे वृत्त वा-यासारखे पसरताच शहरावर शोककळा पसरली. त्यांचे राजकीय चाहते व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची प्रभारी म्हणून धुरा सांभाळणा-या विकास चव्हाण यांनी शिवसेनेची अनेक संघटनात्मक पदे भुषविली आहेत. युवकांचे प्रेरणास्थान व सेनेची मुलूख मैदान तोफ असा लौकीक असणारे चव्हाण २००७ -१२ या कालवधीत पंचायत समिती सदस्य म्हणून कार्यरत होते. यानंतर पक्षात वाढलेल्या स्पर्धेमुळे ते सक्रीय राजकारणापासून दूर होते. त्यांची आर्थीक परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली होती. याशिवाय शारिरीक आजारानांही ते कंटाळले होते. पण चव्हाणांनी शेवटपर्यंत सेनेशी एकनिष्ठता दाखवली त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.