रत्नागिरी : सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करताना विजेचा धक्का लागून सातवीतील विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना गुहागरमधील आंबेरे खुर्द या गावात काल शुक्रवारी घडली. या घटनेत दुसरा विद्यार्थी देखील गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रणव भुवड असे मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून सुजल मोरे हा गंभीर आहे.
गुहागरमधील आंबरे शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने पालक, शिक्षक आणि विदयार्थी स्टेज उभारण्याची तयारी करत असताना प्रणवच्या हातातील लोखंडी पाईप महावितरणच्या विद्युतभारीत तारेला लागला आणि यामुळे प्रणवला विजेचा जोरदार धक्का बसला. हा धक्का एवढा जोरदार होता की प्रणव जागीच ठार झाला, तर सोबत असलेला दुसरा विद्यार्थी देखील गंभीर जखमी आहे झाला. जखमी सुजलला उपचारासाठी तात्काळ रत्नागिरी मधील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. ऐन सणांच्या दिवसात घडलेल्या या घटनेमुळे परिसरावर दु:खाच सावट आहे.